नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणे हे कायद्याने पूर्णतः प्रतिबंधित असून, यामुळे मानवी जीवितासह पक्ष्यांच्या जीवनाला गंभीर धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजाचा वापर, विक्री व साठ्यावर संपूर्ण बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वणी पोलिसांनी दिला आहे.
वणी पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार, नायलॉन मांजा वापरताना आढळलेल्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर तसेच प्रौढ व्यक्तींवर प्रत्येकी २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड थेट संबंधित आरोपींकडून वसूल केला जाईल.
याचबरोबर, नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर २ लाख ५० हजार रुपयांचा (अडीच लाख) मोठा दंड ठोठावण्यात येणार आहे. दोषींकडून दंडाची रक्कम थेट वसूल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्वतंत्र ‘लोककल्याण खाते’ उघडण्यात येणार असून, क्यूआर कोडच्या माध्यमातून दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नायलॉन मांजा अत्यंत धारदार व मजबूत असल्याने दुचाकीस्वार, लहान मुले तसेच पक्ष्यांना गंभीर दुखापत होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये अपंगत्व किंवा मृत्यूदेखील ओढवल्याने उच्च न्यायालयाने यावर बंदी घातली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वणी पोलीस प्रशासनाने नागरिकांना नायलॉन मांजाचा वापर पूर्णतः टाळण्याचे आवाहन केले असून, केवळ सूती किंवा कागदी मांजाचाच वापर करण्याचा सल्ला दिला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड न करता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन वणी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या