वणी :
लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, (रवि नगर) येथे दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती व थोर व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचे संस्कार रुजविणे हा होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे अकॅडेमीक डायरेक्टर,प्राचार्य प्रशांत गोडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून राजमाता जिजाऊ यांनी घडविलेला आदर्श, संस्कारक्षम वारसा व स्वामी विवेकानंदांनी युवकांना दिलेला आत्मविश्वास व राष्ट्रनिर्मितीचा संदेश यांचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. तसेच देवांश जुनगरे, आरोही कळसकर या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा करून व मनोगत व्यक्त केले तसेच अभीर सरमोकद्द्म याने जिजाऊंचा पोवाडा सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. त्यांच्या सादरीकरणास उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, नैतिक मूल्ये, आत्मविश्वास व नेतृत्वगुण वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
अनया दुमोरे व नैतिक ढुमणे यांनी संचालन केले तर स्वरा उईके हिने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.






टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या