वणी :
शहरात दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना घडली असून, स्टेट बँक ऑफ इंडियामधून पैसे काढून घरी जात असलेल्या WCL कर्मचाऱ्याची 70 हजार रुपयांची हॅन्डबॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
राजेश नानाजी चौधरी (वय 59), रा. भोंगळे लेआउट, वणी, हे WCL रेल्वे सायडिंग येथे नोकरीस आहेत. मंगळवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, वणी शाखेतून रोख 70,000 रुपये काढले होते. या रकमेमध्ये 500 रुपयांच्या 80 नोटा व 200 रुपयांच्या 150 नोटा होत्या. ही रक्कम त्यांनी “अभिनंदन ज्वेलर्स” असे नाव असलेल्या हॅन्डबॅगमध्ये ठेवून ती बॅग मोटारसायकल(MH-34-AF-3363) च्या हॅन्डलला अडकवली होती.
SBI बँकेतून आवारी लेआउटकडे जात असताना जटाशंकर चौकाजवळ पांडे मोबाईल शॉपी समोर एका अनोळखी इसमाने त्यांना थांबवून मोटारसायकलच्या मागील सीटवर घाण लागल्याचे सांगितले. मात्र रस्त्यावर वाहतूक असल्याने ते न थांबता भाजीमंडीतील जामनगरी दुकानाजवळ मोटारसायकल उभी करून खाली उतरले.
घाण साफ करण्यासाठी समोरील किराणा दुकानातून पेपर आणण्यासाठी गेले असता, काही क्षणांतच मोटारसायकलला अडकवलेली पैशांची बॅग चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला मात्र बॅग मिळून आली नाही.
या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कलम 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे वणी शहरात खळबळ उडाली असून, बँकेतून पैसे काढणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या