वणी :
नगरपालिका निवडणुकीनंतर जे चित्र समोर आले आहे, ते केवळ निकालापुरते मर्यादित नाही, तर राजकारण कसे करावे याचा धडा देणारे आहे. सत्ता मिळाली की कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवणाऱ्या अनेक पक्षांसाठी हा आरसा ठरावा, अशीच भाजपची भूमिका वणीमध्ये दिसून येत आहे.
वणी नगर परिषदेत १ नगराध्यक्ष आणि २९ पैकी १८ जागांवर भाजपचा निर्विवाद विजय झाला असतानाही, भाजपने विजयाचा उन्माद साजरा करण्यात वेळ घालवला नाही. उलट, ज्या उमेदवारांनी प्रामाणिक लढा दिला, पण अपयशी ठरले, त्यांना वाऱ्यावर सोडण्याऐवजी “तुम्ही पराभूत नाही, पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे” असा ठाम आणि स्पष्ट संदेश भाजपने दिला आहे.
भाजपचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांच्यासह वरिष्ठ नेते पराभूत उमेदवारांच्या घरी जाऊन भेटी देत आहेत. या भेटी केवळ औपचारिकतेसाठी नाहीत, तर त्या भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे आणि राजकीय परिपक्वतेचे जाहीर प्रदर्शन आहेत. निवडणूक हरली म्हणून कार्यकर्ता संपला, अशी संकुचित मानसिकता भाजपची कधीच नव्हती आणि नसणार, हेच या कृतीतून अधोरेखित होत आहे.
आज वणीच्या राजकारणात जे दिसत आहे, ते सत्तेचा माज नसलेले, पण संघटनेचा कणा मजबूत करणारे राजकारण आहे. भाजपने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, हा पक्ष केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नसून, कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवणारा आणि त्यांच्यासोबत उभा राहणारा आहे.
वणी नगर परिषदेत मिळालेला बहुमताचा विजय आणि त्यानंतर दाखवलेली ही संघटनात्मक एकजूट, विरोधकांसाठी स्पष्ट इशारा आहे. भाजप केवळ सत्तेत येतोच नाही, तर सत्ता टिकवण्यासाठी संघटना जपतो. वणीतील हे राजकीय चित्र येणाऱ्या काळात भाजपची पकड अधिक घट्ट करणारे ठरणार आहे.







टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या