वणी :
शहरात बेकायदेशीर शस्त्र व्यवहाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, ऑनलाईन पद्धतीने पार्सलद्वारे तलवार मागवणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई करत प्रतिबंधित शस्त्र जप्त केले आहे. या प्रकरणी संबंधित इसमाविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास वणी पोस्ट ऑफिसमध्ये संशयास्पद पार्सल आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन वणी येथील गुन्हे शोध पथकाने तातडीने पोस्ट ऑफिस गाठून चौकशी सुरू केली. तपासात सदर पार्सल हे पंजाब येथून मागविण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
पार्सलवरील पत्त्यानुसार वणी तालुक्यातील एका गावात शोध घेतला असता संबंधित इसम पोलिसांच्या ताब्यात आला. चौकशीत त्याने ऑनलाईन माध्यमातून तलवार मागविल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीस पोस्ट ऑफिसमध्ये आणून पंचांसमक्ष पार्सल उघडण्यात आले.
पार्सलमध्ये निळ्या रंगाच्या कव्हरमध्ये ठेवलेली लोखंडी धातूची धारदार तलवार आढळून आली. तलवारीची एकूण लांबी सुमारे 2 फूट 8 इंच, धार असलेल्या भागाची लांबी 2 फूट 3 इंच, रुंदी अंदाजे 4 इंच असून तिची किंमत सुमारे 1300 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही तलवार बेकायदेशीर व प्रतिबंधित शस्त्र असल्याने पोलिसांनी ती पंचनामा करून जप्त केली, तसेच संबंधित इसमास पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणी शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 4 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे ऑनलाईन माध्यमातून शस्त्रे मागवण्याच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त होत असून, पोलिसांकडून अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या