वणी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या भव्य २०२५ च्या गरबा महोत्सवात संपूर्ण देशाचे मनोरंजन करणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील 'टप्पू सेना' (टप्पू, पिंकू आणि गोगी) सहभागी झाली आणि वणीकरांना एक अविस्मरणीय भेट मिळाली. २८ सप्टेंबर २०२५ रोजी वणी येथील राम शेवाळकर परिसरात हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
▪️ लहानग्यांचा उत्साह, गर्दीचा उच्चांक :-
मनसे नेते राजू उंबरकर यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवाला कलाकारांना पोहोचायला थोडा उशीर झाला असला तरी, वणीकर जनतेचा उत्साह जराही कमी झाला नाही. लहान मुले, गरबा स्पर्धक आणि नागरिक उशिरापर्यंत आपल्या लाडक्या कलाकारांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कलाकारांचे स्वागत मनसे नेते राजू उंबरकर यांच्या कन्या कु. मुक्ता राजू उंबरकर यांनी केले. उपस्थित कलाकारांनी उपस्थितांशी संवाद साधला. स्पर्धकांसोबत गरबा नृत्यातही सहभाग घेतला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये चैतन्याची लाट पसरली.
▪️ सांस्कृतिक एकोपा आणि सेलिब्रिटींचा सहभाग :-
मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी या आयोजनामागील आपला उद्देश पुन्हा एकदा स्पष्ट केला, की समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे आणि समाजाला एकत्र आणणे हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. 'टप्पू सेने'च्या कलाकारांच्या सहभागामुळे या सांस्कृतिक जागरला युवा वर्गाची मोठी उपस्थिती लाभली. यापूर्वी, लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनीही महोत्सवात हजेरी लावली होती.
पारंपरिक गरबा आणि दांडियाच्या नृत्यांनी सजलेला हा महोत्सव स्थानिक कलाकारांसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरला. या विक्रमी गर्दीमुळे वणी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी केले, सूत्रसंचालनाची धुरा हरीश कामारकर यांनी सांभाळली, तर गरबा महोत्सव समितीचे अध्यक्ष साहिल सलाट यांनी आभार मानले. 'टप्पू सेने'च्या या एन्ट्रीमुळे वणीच्या गरबा महोत्सवाने यंदा सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या दृष्टीने एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.


.jpg)


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या