प्रतिनिधि/ मंगेश राऊत :
प्रिय डॉक्टर,
पुन्हा एक नवीन पत्रसंवाद. ऑगस्ट महिना. अकरा वर्षे पूर्ण झालीत. कसे आहात तुम्ही? विचार आणि कृतीद्वारे अजूनही आमच्या सोबत असल्याची आमची भावना आहे. बोलता येतं तुमच्याशी. काळाची ताकद जबरदस्त असते ना, डॉक्टर! ती भळभळणारी वेदना आता नाही राहिलीये. त्या जागी आता आहे समर्पित भावनेने काम करण्याचा निर्धार. विपरीत परिस्थितीतही उभे राहण्याची प्रेरणा. संघटना म्हणून वाढविस्ताराचा दृढ संकल्प. यात तुम्ही उभे आहात आमच्या साथीने. आजही लख्ख आठवतं, तुम्हाला फोन केला की तिकडून येणारा तुमचा हृदयीचा आवाज, "काय रे विनायक?". आता संघटनेत काही छान काम झालं तर, "शाब्बास विनायक" म्हणून आजही असे शब्द ऐकायला येतात. माधव बावगे सरांच्या नेतृत्वात संघटना उत्साहाने वाटचाल करीत आहे. आणि तुम्ही मात्र सुरेश भटांच्या त्या गझलेतल्याप्रमाणे, "विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही", म्हणत आजही आमच्यासोबत आहात.
डॉक्टर, कार्यकर्त्याला प्रत्येक काळ अस्वस्थ करणाराच असतो ना? कधीच त्याला सगळं छान चाललंय असं वाटत नाही. कारण तो प्रश्नांवर काम करतो. ते प्रश्न त्याला सतावत असतात. अस्वस्थ करीत असतात. कधी काही चांगलं घडलं तर अजून अधिक चांगलं घडण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. म्हणून प्रत्येक काळ त्याला नवी आव्हाने वाटत असतो. तो परिवर्तनाची वाट शोधत असतो. नवनिर्माण करीत असतो.
तसा हा काळही प्रचंड आव्हानांचा. अनेक प्रश्नांचा आहे. त्या प्रश्नांकडे जाण्यापूर्वी डॉक्टर, एक किमान समाधानाची बाब तुम्हाला सांगायला हवी. धर्मांध राजकीय शक्तींना या देशाच्या जनतेने किमान अंकुश ठेवण्यात तरी यश मिळवले आहे. उन्मत्त, निरंकुश, विद्वेषी आणि संविधानमूल्यांविरोधी पक्षाला त्याची जागा दाखवली. एकाच वेळी लोकांच्या धार्मिक भावनांना भडकावून, दुसऱ्या बाजूला सर्व प्रकारचा मीडिया, शासकीय यंत्रणा, प्रसंगी न्यायव्यवस्थेला वापरून विरोधकांना नामोहरम करायचे, आणि प्रचंड पैसा वापरून जनमत आपल्या बाजूने करायचे, हा जो प्रयोग त्यांनी उभा केला, या देशाच्या जनतेने त्याला पराजित केले आहे. पूर्ण खाली जरी खेचू शकलो नाहीत, पण निरंकुशता मात्र दिली नाही. हेही नसे थोडके. म्हणून समाधान आहे.
पण ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्राची आव्हाने मात्र तशीच शाबूत आहेत. दोन घटना तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबाच्या दर्शनाला गर्दी उसळली. महिलांचा छळ करणारा, विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेला, तुरुंगवारी केलेला हा बाबा. याच्या सत्संगाला काही हजार भाविकांची अपेक्षा असताना, दोन लाखांपेक्षा अधिक भाविक जमले. भोलेबाबाच्या पायाखालची माती घेण्यासाठी भाविक वाकले आणि प्रचंड चेंगराचेंगरी होऊन १२२ लोकांनी आपला जीव गमावला. त्यात महिला आणि मुलांचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण देशालाच हादरवून सोडणारी ही घटना.
आणि दुसऱ्या बाजूला, क्रिकेटचा विश्व कप जिंकल्यानंतर मुंबईला आयोजित केलेली विजयी रॅली. यात तीन लाख मुंबईकर आठ तास रस्त्यावर होते. यातही वाहनांचे नुकसान आणि किरकोळ जखमी झालेले लोक आहेतच.
या दोन्ही गर्दी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, डॉक्टर. हाथरसची गर्दी जीवनातील समस्यांनी बेजार झालेल्या जनतेची आहे. जे जीवनाचे प्रश्न स्वतः सोडवण्याचं सामर्थ्य आणि इच्छाशक्ती गमावलेले लोक आहेत. प्रश्नांची उत्तरं ही जनता बाबाच्या पायाखालच्या मातीत शोधत आहे. आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारी, महागाई, प्रचंड जीवघेणी स्पर्धा, नात्यांमधील तणाव, आशा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण होण्याबाबतच्या अनिश्चितता याने बेजार झालेली तरुणाई देखील निराशच आहे. ही निराशा विसरण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे तीन लाखांची आठ तास रस्त्यावर झालेली उन्मादी गर्दी. जसं व्यसन प्रश्न विसरल्याचा भास निर्माण करतं, आनंदाची खोटी नशा तयार करतं, अगदी तेच कार्य ही उन्मादी गर्दी पार पाडते.
खरेतर या दोन्ही गर्दी समाजाच्या निराशेचे प्रतीक आहेत. म्हणून एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या निराशेला भांडवल म्हणून वापरलं जातं. कधी ते बुवा-बाबा वापरतात, कधी राजकारणी याचा वापर करतात, तर कधी इथली बाजार व्यवस्था याचा खुबीने वापर करते. लक्षातही येत नाही. आपली लढाई आपल्याला किती व्यापक पातळीवर लढावी लागणार आहे, याची स्पष्ट जाणीव करून देणारी ही दोन उदाहरणे आहेत.
काळ बदलतोय, डॉक्टर. आणि पिढीही बदलत आहे. हे नैसर्गिक जरी वाटत असलं, तरी आताच्या पिढीचा बदलाचा वेग प्रचंड आहे. पुस्तकांपासून दूर गेलेली आणि ज्ञानाचा कचरा हातात असलेली ही पिढी. या पिढीला मदतीची गरज आहे. यांना केवळ दोष देऊन चालणार नाही. आपल्याला त्यांची भाषा शिकावी लागेल. भावविश्वही समजून घ्यावं लागेल त्यांचं. यशस्वी आयुष्याला विचारांची जोड असते हे पटवून द्यावे लागेल. आणि हा विचारांचा पाया 'भारतीय संविधान' आहे इथपर्यंत आणावं लागेल.
आपली संघटना त्याच दिशेने काम करतेय डॉक्टर. आपली युवा कार्यकर्ती प्रियंका खेडेकरच्या नेतृत्वात आपण युवा छावणी सुरू केली. या पहिल्याच वर्षी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि संघटनेच्या तरुणाईने या छावणीचे संयोजन केले. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह आपल्या संघटनेच्या मार्फत होत आहेत. मुलांना खगोलाचे शास्त्रीय ज्ञान देणारे 'तारांगण' आपण सुरू ठेवले आहे. विविध उपक्रम, सोशल मीडिया, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प, राष्ट्रीय अनुसंधान, विवेक वाहिनी, मानसिक आरोग्य व्यवस्थापन, महिला, प्रशिक्षण, संघटनेचे मुखपत्र अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका यांसह इतरही विभागांचं काम जोमाने सुरु आहे. सव्वा दोनशेपेक्षा अधिक शाखा आणि १०० पेक्षा अधिक ठिकाणी आपले संपर्क आहेत. यावेळी इस्लामपूर येथे झालेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणीसाठी ३२ जिल्ह्यातून २६० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. आजपर्यंतचा हा उच्चांक आहे. संघटनेच्या वाढविस्ताराला प्रचंड संधी आहे. त्यासाठी संघटनेला तयार करण्याचा आपला निर्धार आहे.
आपल्या संघटनेला आता ३५ वर्षे पूर्ण होत आहेत, डॉक्टर. यानिमित्ताने आपण आळंदीला पस्तीस वर्षे पूर्तीचे अधिवेशन घेत आहोत, संत ज्ञानेश्वरांची आळंदी येथे.
मी अविवेकाची काजळी l
फेडूनी विवेक दीप उजळी ll
तै योगिया पाहे दिवाळी l निरंतर ll
असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमीत हे अधिवेशन संपन्न होणार आहे.
त्यातील एक दिवस "संविधान सन्मान परिषद" असेल आणि पुढील दोन दिवस पस्तीस वर्षांच्या वाटचालीचे सिंहावलोकन आणि पुढील पंधरा वर्षाच्या भविष्यकालीन वाटचालीचा वेध घेणारं आणि दिशा ठरवणारं हे अधिवेशन असणार आहे. हाथरस प्रकरणानंतर जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर होण्याची मागणी आता राजकीय पक्षच करीत आहेत. जो कायदा महाराष्ट्रात तुमच्या बलिदानाच्या दुसऱ्याच दिवशी अस्तित्वात आला, तो कायदा आता देश पातळीवर होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आव्हान मोठे आहे पण ते संघटना म्हणून आपण स्वीकारायला हवे ना. डॉक्टर!
शेवटी अजून एक गोष्ट सांगायला हवी. अकरा वर्षानंतर खुनाच्या खटल्याचा निकाल लागला. केवळ मारेकऱ्यांना जन्मठेप, पण कट रचणारे पुराव्या अभावी निर्दोष सुटले. निकाल समाधान देणारा नाही. सगळ्यांवर आरोप सिद्ध होऊन त्यांना फाशी होऊन संपवावे, असेही वाटत नाही. पण समाजात विचार स्वातंत्र्याचा संस्कार अबाधित ठेवण्याची जबाबदारी इथल्या शासन व्यवस्थेची, तपास यंत्रणांची आणि न्यायव्यवस्थेची आहे. ही जबाबदारी पार पाडण्यात या व्यवस्था अपयशी ठरत असल्याचे दुःख आहे.
३५ वर्षांची वाटचाल. या वाटचालीत आपण नक्की काही गोष्टी मिळवल्या, डॉक्टर. पण अजूनही आम्ही आमच्या पूर्ण क्षमता वापरलेल्या नाहीत याची जाणीव आहे. आणि सगळंच काही छान छान आहे असेही नाही. अजूनही काही प्रश्न, ताण आहेतच. पण विचारांसाठी उभारलेल्या संघटनेवरील निष्ठा आणि सच्चेपणाची ताकद आम्हा सगळ्यांना तारून नेईल असा आम्हा सगळ्यांनाच विश्वास आहे. आमचा अनुभवही असाच आहे.
डॉक्टर, तुम्हाला कविता खूप आवडायच्या ना. मग कवी सुरेश भटांच्या एका गझलेच्या शेवटच्या चार ओळी तुम्हाला पुन्हा सांगाव्याशा वाटतात,
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो...
अडथळ्यांना भिऊन अडखळणे,
पावलांना पसंत नाही...
बोलत राहू, डॉक्टर....
लेखक✒️:- विनायक सावळे,
राज्य सरचिटणीस.
9403259226.


