(20 ऑगस्ट, शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन )
25 वर्ष झाले असतील आता. तो क्षण मला जसाचा तसा आठवतो. धुळे जिल्ह्याचा दौरा होता. डॉ. दाभोलकरांसोबत. "अंधरुढींच्या बेड्या तोड्या" नावाचं अभियान आपण सुरू केलेलं होतं. तेव्हा टाटा सुमो गाडी फार प्रसिद्ध. त्यात आम्ही सलग तीन दिवस सोबत होतो. धुळे जिल्ह्यातील शाखांच्या भेटी सुरू होत्या. आणि एक भेट साक्री तालुक्यातील कासारे शाखेत झाली. तेथे डॉक्टरांचा शॉल देऊन सत्कार करण्यात आला. छान जाहीर सभा झाली. तिथून पुढे आम्ही साक्री शाखेला भेटत धुळ्याला आलो. सायंकाळ झालेली. बहुदा सात वाजले असतील. थोडं अंधारलेलं. गाडी सावरकर पुतळ्याजवळून स्काऊट भवन जवळ आली. येथेच डॉक्टरांची सभा होती. आम्ही गाडीतून उतरलो. उतरतांना डॉक्टरांनी त्यांना मिळालेली शॉल हातात घेतली, ती सत्कार करतात तशी माझ्या अंगावर टाकली, आणि हसत हसत म्हणाले, "धुळे जिल्हा दौऱ्याचं उत्कृष्ट संयोजन केल्याबद्दल विनायक सावळे यांचा सत्कार करण्यात येत आहे." मलाही खूप गम्मत वाटली.( खरंतर त्या दौऱ्याचा मी संयोजक नव्हतो.) हसू आले. मग मी अंगावरून काढून ती परत करायला लागलो. डॉक्टर म्हणाले, अरे ठेव तुझ्याचकडे, तुलाच दिलीये शॉल. मी नाही नेत सोबत. मी ती शाल हौसेने घेतली. आपल्याला मिळालेली शॉल डॉक्टर असेच दौऱ्यात कार्यकर्त्यांना देऊन टाकत असत हे मला नंतर समजले.
नंतर संघटनेत कुठेही दौऱ्याला जाताना मी ती शॉल सोबत वापरायला लागलो. पण त्या शालीचे मला विशेष महत्व नव्हते. डॉक्टरांनी दिलीय म्हणून कौतुक नक्कीच होते. अनेकांना मी सांगायचो पण... "ही शॉल मला डॉक्टरांनी दिलीये ",असं.
पण 20 ऑगस्ट 2013 नंतर मात्र त्या शालीला अतोनात महत्त्व आले. त्या शालीची किंमत वाढली. डॉक्टरांनी सहज म्हणून दिलेली वस्तू आता डॉक्टरांची अत्यंत महत्त्वाची आठवण झाली. तिला डॉक्टरांच्या अंग खांद्याचा स्पर्श झालेला आहे. आणि ती डॉक्टरांच्या हातानेच माझ्या अंगावर आलेली आहे. सोबत चार कौतुकाचे शब्दही डॉक्टरांच्या त्या सुप्रसिद्ध मिश्किल हास्यासह आलेले आहेत. आता ती शाल आठवणींचं, भावनांचं प्रतीक झालेली आहे.
आजही ती शॉल माझ्याकडे आहे. ती पांघरण्या पलीकडे अनेक भूमिका पार पाडते. त्या शालीसोबत बोलता येतं. चर्चा करता येते. स्वतःचे अनुभव सांगता येतात. स्वतःचा ताण शेअर करता येतो. चुकलं की मोकळेपणाने 'सॉरी' म्हणता येतं.डॉक्टर ही तिच्यातूनच प्रतिसाद देतात. झोपताना उशी म्हणून घेतली मायेच्या उबेने आपण डॉक्टरांच्या कुशीत शिरलोय असं वाटतं. आधार वाटतो. पावित्र्य भावनेचा अनुभव येतो. आनंदाच्या क्षणी तिला मिठी मारता येते. आणि दुःखाच्या क्षणी पाणवलेले डोळे पुसायला ती पुढे असते."होईल सगळं नीट, थोडा वेळ जाऊ दे, काळजी नको करुस ", अशी सांत्वना करत कोसळू देत नाही. विचार आणि भावनांची अनोखी एकरूपता जर झाली, तर संवादाला जिवंतपणाच्या,मरणाच्या, समोर असण्याच्या, नसण्याच्या सगळ्या मर्यादांची कुंपण तुटून पडतात. गळून पडतात.
आधीच मी प्रचंड वेंधळा आहे. विविध ठिकाणी आपल्या वस्तू विसरणं हा माझा जणू जन्मसिद्ध अधिकारच आहे. पण गेले पंचवीस वर्षे ही शॉल मात्र माझ्या सोबत आहे. याचंही मला आश्चर्य वाटतं.
सहज गमतीने मिळालेली गोष्ट आज मात्र माझा मोठा आधार बनलेली आहे. डॉक्टरांशी संवाद साधण्याचा मार्ग बनलेली आहे. प्रेरणादायी आठवण बनलेली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
लेखक ✒️:- विनायक सावळे,
राज्य सरचिटणीस,
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
9403259226


