स्वातंत्र्यदिनी मित्रांसोबत झुनका येथील पोथरा तलावावर फिरायला गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १५ ऑगस्टला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहेत. मृतक युवकाचे नाव यश श्रीराम साखरकर असून संत ज्ञानेश्वर वार्ड पटवारी कॉलनी, हिंगणघाट येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार १५ ऑगस्टला सुट्टी असल्याने यश हा आपल्या मित्रांसोबत झुनका येथील पोथरा तलावावर फिरायला गेला होता. यावेळी त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडू लागला, आजुबाजुच्या लोकांनी त्याला कसेबसे तलावाबाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदिप गाडे, पोलिस कर्मचारी अमर धोटे, नारायण वर्टी यांनी घटनास्थळी जाऊन यश साखरकर याला गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितेश आत्राम यांनी यश ला तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी समुद्रपुर येथिल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यासंबंधी गिरड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत. यश साखरकर हा नुकताच १२ वी पास झाला होता. आता त्याने इंजिनिअरसाठी नागपूर येथे ॲडमिशन सुध्दा घेतले होते. मात्र काळाने त्याचे इंजिनिअर बनण्याचे स्वप्न हिरावून घेतले.


