हनुमान जयंतीनिमित्त वणी शहरातील मारुती मंदिरे रोषणाईने सजविण्यात आली होती. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची वर्दळ होती. वणीतील प्रमुख मंदिरांबरोबरच इतरही मंदिराजवळ हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. शहराच्या विविध भागात संगीतमय हनुमान चालिसा पठण सोहळ्यात हनुमान भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.
श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, रामायण पारायण, धार्मिक कार्यक्रम, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहरातील विविध मंदिरांमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मंदिरांच्या बाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
वणी शहरातील कनकवाडी-संजय नगर येथील हनुमान मंदीरात हनुमान मंदिर समिती कडून जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान जयंतीनिमित्त पहाटे ०५:०० वाजता उपाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या कडून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिरामध्ये सकाळी ११:०० वाजता भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी कनकवाडी-संजय नगर येथील भगवान हनुमाचे दर्शन घेतले. संध्याकाळी ०७:०० वाजता भगवान हनुमान यांची महाआरती करून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी कनकवाडी-संजय नगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष देविदास चौधरी, कोषाध्यक्ष प्रसन्ना भालेराव, सचिव अरुण गुरनुले, सहसचिव सतीश सुरशे, सदस्य रवि लांडे, अमोल कोटेचा, प्रकाश नागतुरे, विजय बांगडे, किसन कडू, प्रज्योत वासाडे, विनायक कुत्तरमारे, किसन तुराणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.






