कृषी संशोधनासाठी पीएचडी विद्यार्थ्यांची फेलोशिपसाठी राज्य सरकारकडे निवेदन
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) संशोधन करत असणारे आचार्य पदवीचे (Ph.D.) विद्यार्थ्यांची फेलोशिप मिळण्याबाबत मागणी तीव्र होत आहे. यासंदर्भात निवेदन कृषी विद्यापीठांमधील कुलगुरू व महाराष्ट्राचे कृषिमंत्री मा. धनंजय मुंढे यांना देण्यात आले. सारथी, महाज्योती, बारटी अंतर्गत मिळणाऱ्या फेलोशिप याची मदत विद्यार्थ्यांना अल्प करण्यात आली. याविरोधात कृषी क्षेत्रात आपली महत्त्वाची संशोधनासाठी असणाऱ्या भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य कृषीचे आचार्य पदवीचे विद्यार्थी (Ph.D.) मागत आहेत. कीटक, वनस्पतींवरील रोग, सुधारित वाण, नवनवीन खते, पिकांवरील जैविक व अजैविक ताण, जलसंवर्धन, पशूपालन अशा अनेक कृषी क्षेत्रातील समस्यांवर संशोधन करून त्याचे उपाय शोधण्याचे काम हे विद्यार्थी करत असतात. कृषी क्षेत्रात संशोधनासाठी लागणारा खर्च हा खूप जास्त आहे. त्याकरिता आर्थिक सहाय्यता लाभणे आवश्यक आहे. हजारो कृषी पदवीधर विद्यार्थ्यांमधून स्पर्धा परीक्षा देऊन हे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पात्र ठरतात. देशाच्या भविष्यातील अन्नसुरक्षेसाठी कृषी संशोधनावर भर व शेतकऱ्यांच्या लेकरांना उच्च शिक्षण घेण्याकरिता सहाय्यता फार आवश्यक आहे. आपल्या मागण्या महाराष्ट्र सरकारकडून मान्य व्हाव्यात अशी विनंती सर्व विद्यार्थी करत आहेत.


