Type Here to Get Search Results !

आज वणीत सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम

वणी, शुभम कडू : 

                           वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त सुप्रसिद्ध समाज सुधारक महाराष्ट्र भूषण सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणीचा प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम दि. ०९ जानेवारी रोज मंगळवार संध्या. ०७:०० वाजता शहरातील जैन लेआऊट येथील माऊली मंदिर परिसरात माऊली परिवारातर्फे आयोजित करण्यात आला आहे.


       👉👉 सत्यपाल महाराज यांचा परिचय 👇👇

 

सामाजिक प्रबोधनकार सत्यपाल महाराजांकडे आज आधुनिक युगातील समाजसुधारक म्हणून पाहिलं जातं. आज समाजात जी अनागोंदी माजली आहे त्याकडे लोकांचे लक्ष वेधून सत्यपाल महाराज त्यांना वर्तमानातील सत्याशी अवगत करण्याचे कार्य करत आहेत. अनिष्ट रूढी परंपरांवर महाराज मार्मिक टीका देखील करतात त्यामुळे कीर्तनात बसलेल्या व्यक्तीला आपल्या चुकीची जाणीव होते आणि त्याच्या विचारांमध्ये देखील बदल होण्यास मदत होते.


सत्यपाल महाराज आधुनिक युगात प्रबोधनाचे उत्तम कार्य करीत आहेत. दाखले देत देत, विनोदी शैली हाताळून ऐकणाऱ्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे कसब त्यांना अवगत झाले आहे. त्यांच्या कीर्तनाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित असतो. विशेषतः ग्रामीण भागात राहिल्याने महाराजांना समाजाची जणू नस गवसली आहे..! काय सांगितल्याने आणि कश्या पद्धतीने मनोरंजन करून प्रबोधन करता येईल याची सत्यपाल महाराजांना जाणीव आहे आणि त्यामुळेच त्यांच्या कीर्तनाला विशेष गर्दी होते.

आजपर्यंत महाराजांनी १४,००० पेक्षा जास्त गावांमध्ये समाज प्रबोधनाची कीर्तनं केली आहेत. त्यांच्या कीर्तनाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील प्रसिद्ध असलेले वाद्य 'खंजेरी' महाराज आपल्या कीर्तनात ७ खंजेरी एकत्र करून विविध प्रकारे आवाज काढतात त्यामुळे त्यांची 'सप्तखंजेरी' खूप प्रसिद्ध झाली आहे.

            संत गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज हे सत्यपाल महाराजांचे आदर्श आहेत. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून महाराज ज्या ठिकाणी कीर्तन करायचे असेल त्या ठिकाणी स्वतः स्वच्छता आणि साफसफाई करायला देखील मागेपुढे पाहत नाही. सत्यपाल महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, हागणदरी मुक्त गाव, शिक्षणाचे महत्वं, या विषयांवर सामाजिक प्रबोधन केले आहे.

                   विदर्भात त्यांचा मोठा चाहता वर्ग असून विदर्भातल्या जवळपास सर्वच ठिकाणी आजवर त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सत्यपाल महाराज म्हणतात की समाजाचे प्रबोधन करतांना आध्यात्मिकतेची जोड देऊन सोबत संगीताची साथ असेल तर तो विषय ऐकणाऱ्याच्या मना पर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने पोहोचतो आणि समाजात जाणीव जागृती उभी रहाते. सत्यपाल महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक म्हणून देखील कार्यरत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad