Type Here to Get Search Results !

वेकोलि विरोधात उद्या मनसे आक्रमक, मालवाहतूक बंद पाडण्याचा दिला इशारा.

वणी, शुभम कडू : तालुक्यातील येनक, येनाडी, शिवणी, कोलगाव, शेवाळा यागावातून वेकोलीची कोळसा वाहतूक होत आहे. दरम्यान या गावातून होणाऱ्या वाहतुकीमुळे रस्त्यांची पूर्णतः चाळन झालेली आहे. त्याचबरोबर शेतामध्ये उभी असलेली पिके पूर्णतः उध्वस्त झालेली आहे. कोळसा वाहतुकीतून उडणाऱ्या धुळीमुळे अनेक आजारांचा सुद्धा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. या सर्व बाबींना घेऊन येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व त्याचबरोबर वेकोलीच्या प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करून ही वाहतूक थांबवावी व होत असलेल्या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी केली. परंतु येथील कास्तकारांच्या मागणीला केराची टोपली दाखवत संबंधित विभागाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे येथील कास्तकारांनी अखेर आपला हा मुद्दा मनसेकडे मांडला. या कास्तकारांना तात्काळ प्रतिसाद देत मनसेने संबंधित विभागाशी संपर्क साधला त्यावर संबंधित विभागाकडून येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. 
              शेतकऱ्यांच्या शेतात सध्या कापसाचे व तुरीचे पीक ऊभे आहे .या वाहतुकीमुळे उडणारी धूळ आणि  इतर बाबींमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करुन त्यांना मदत व्हावी अशी अपेक्षा होती. यासाठी मनसेने केलेल्या मागणीने पंचनामे सुध्दा झाले. मात्र या पंचनाम्याना एक महिन्याचा अवधी उलटला तरी सुद्धा या आधारे मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक पावित्रा घेतला आहे. उद्या दिनांक ०७ डिसेंबर २०२३ रोजी  सकाळी ११.०० वाजता पासुन वेकोलिची वाहतूक बंद पाडून शेतकरी आपल्या मागण्या मांडणार असल्याचे निवेदन आज मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी या भागातील सर्व शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी या गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते. उदया शेतकरी आणि मनसेकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाचे पडसाद आणि यावर वेकोलि प्रशासन काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad