Type Here to Get Search Results !

विद्युत तारा व लोखंडी खांब चोरी प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी - अजिंक्य शेंडे

वणी, शुभम कडू :  युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी विद्युत तारा व लोखंडी खांब चोरी प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या शंकर सुपारी कुमरे, या घटनेची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी आणि वणी पोलीस ठाण्यात किरकोळ तक्रारींची रिपोर्ट घेत नसल्याबाबतचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक मा. पवन बनसोड साहेब यांना उपविभागीय पोलिस अधिकारी मा. गणेश किंद्रे साहेब यांच्या मार्फत देण्यात आले. 

           गेल्या एक वर्षापासून वणी, शिरपूर व मुकुटबन पोलिस ठाण्याच्या हद्दीत महावितरणच्या विद्युत तारा व लोखंडी खांब कापण्याचा सपाटा सुरू असून यात लाखों रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला जात आहे. याबाबत विद्युत विभाग मार्फत वणी, शिरपूर आणि मुकुटबन पोलिसात तक्रार दाखल असुन अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने चोरटे मोकाट फिरत आहे. गंभीर बाब म्हणजे याप्रकरणात आतापर्यंत तिन युवकांचा विद्युत करंट लागुन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दि. १७ नोव्हेंबर रोजी मुकुटबन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परसोडा परिसरात विद्युत तारा कापण्याचा प्रयत्न करत असताना एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अश्याच प्रकारच्या घटनेत काही महिन्यांपूर्वी दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. तरीसुद्धा विद्युत तारा व लोखंडी खांब कापण्याचा सपाटा सुरूच आहे आणि चोरीतील मुद्देमाल हा भंगार व्यावसायिकांच्या घशात घातला जातो आहे. भंगार व्यावसायिक मालामाल होत आहे आणि चोरटे दारुच्या नशेत आपला जीव गमावत आहे. तर विद्युत तारा कापल्यावर वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऐवढी मोठी गंभीर घटना घडत असताना मात्र वणी, शिरपूर व मुकुटबन पोलिस कारवाई न करता हातावर हात ठेवून शांत बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपण या चोरीच्या घटनेचा तपास करावा व गुन्हेगारांवर आठ दिवसांच्या आत कारवाई करावी, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

                 तसेच वणी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेतातील साहित्य, स्पींकलर, झटका मशीन असे साहित्य चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र याबाबतची तक्रार देण्यासाठी शेतकरी वणी पोलीस ठाण्यात गेले असता तक्रारींची रिपोर्ट ( FIR) घेण्यात येत नाही. त्यांना लेखी स्वरूपात तक्रार देण्याचा सल्ला देतात मात्र तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. याकडेही लक्ष देऊन शेतकऱ्याच्या तक्रारी दाखल करून घेण्यात यावा. अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad