वणी, शुभम कडू : मराठी पाट्या प्रत्येक दुकानांवर असल्याचं पाहिजे. महाराष्ट्रात राहायचा असेल तर मराठी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरेंचं होतं. कोर्टाने मराठी पाट्या लावण्याची २५ पर्यंतची मुदत दिली होती. सगळ्या शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापनामध्ये मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकान व संस्था अधिनियम १९४८ अन्व्ये बंधनकारक आहे. असं असतांना देखील वणी शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापनांवर कोणती ही कार्यवाही नगर परिषद कडून होताना दिसत नसल्याचाही आरोप यावेळी आता मनसेकडून करण्यात आला. तर आज मनसे शहराध्यक्ष शिवराज पेचे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे यांना निवेदन देऊन शहरांतील मराठी व्यतिरिक्त इतर भाषांच्या पाट्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली.

मनसेने आधीपासूनच मराठी पाट्या लावण्याबद्दल राज्यात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामध्ये कोर्टाने दिलेल्या डेडलाईननंतर देखील काही दुकानांवर इंग्रजी पाट्या अजून ही दिसत असल्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या दोन दिवसात तर न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करुन शहरांतील सर्व पाट्या मराठीत कराव्या अन्यथा या मुद्द्याला घेऊन मनसेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनातून दिला आहे. निवेदन देते वेळी मनसेचे गितेश वैद्य, लक्की सोमकुंवर, हिमांशू बोहरा, सचिन जाधव, वैभव पुरानकर, संस्कार तेलतुंबडे, कुणाल सोमशेट्टीवार यांच्या सह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या