वणी विभागासाठी वरदान असलेल्या कोळसा खाणी मात्र वेकोली प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे सामान्यांसह शेतकऱ्याच्या जिवावर उठले आहे. परिसरातील पैनगंगा व मुंगोली या कोळसा खाणीतून सध्या कोळशाची मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू आहे. वाहतूक करणारी वाहने कालबाह्य तर झालीच, परंतु अनेक वाहनांना नियमाप्रमाणे आवश्यक असलेले साहित्यसुद्धा अपूर्ण असून, अनेक वाहनांचे टायर कमी, काही पंक्चर, तर काही फुटलेल्या अवस्थेत असल्याने या वाहनांमुळे परिसरातील रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे.
शेती पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून वे.को.ली. प्रशासनाकडे ते सादर करावी अशी मागणी उंबरकर यांनी काही दिवसापूर्वी कृषि विभाग आणि महसूल प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत महसूल विभाग व कृषी विभागाने तात्काळ सर्व पिकांचे पंचनामे व सर्वेक्षण करून त्याचा अहवाल वे.को.लि.कडे पाठविला परंतु बरेच दिवस उलटूनही या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे काल (दिनांक २४ नोव्हेंबर) रोजी राजु उंबरकर यांनी या विभागातील हजारो शेतकऱ्यांना सोबत घेत क्षेत्रिय महाप्रबंधक ताडाळी चंद्रपूर येथे धडक दिली. आणि ह्या शेती पिकांचे नुकसान भरपाई तात्काळ द्यावी व त्याच बरोबर ह्या रस्त्यांची बांधणी करुन द्यावी अशी मागणी केली.
वाहतूक करीत असताना उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेती पिकांवर याचा परिणाम होऊन उत्पन्न घटून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने ही वाहतूक अवैधरीत्या चालू असल्याचा आरोप त्यांनी केला. कोळसा खाणीमधून कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रदूषणामुळे आणि उडणाऱ्या धुळीमुळे कापूस पीक उत्पादक शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले. जर येत्या २८ तारखेपर्यंत शेतकरी बांधवांना त्याचा मोबदला मिळाला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आक्रमक पवित्रा घेऊन भव्य आंदोलन करेल, असा इशारा मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांनी दिला आहे.
राजु उंबरकर
नेता - महाराष्ट्र नवनिर्माण सेना





