तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत स्मॉल वंडर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. श्रावण ज्ञानेश्वर लोणबले, उज्ज्वल राजेंद्र पिपराडे आणि अर्णव अमोल बरडे यांनी मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील क्रीडा संकुलात तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या श्रावण ज्ञानेश्वर लोणबले याने प्रथम क्रमांक मिळविला. तर १४ वर्षांखालील वयोगटात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या उज्ज्वल राजेंद्र पिपराडे आणि अर्णव अमोल बरडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला.
या तिन्ही विद्यार्थ्यांची आगामी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडाशिक्षक शंकर गुलाबराव मालखेडे, प्राचार्य डॉ. मंजुषा सागर अहमद शेख तसेच अतुल बेंदूरकर, प्रेमकुमार इंगोले, वैभव करडे, मेघा शेंडे, प्रीती टापरे, रोशन खैरे, अक्षय वानखेडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी पुढील स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे आणि यवतमाळचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

