Type Here to Get Search Results !

१३ वर्षे पोलिसांना चकवा, अखेर उत्तर प्रदेशात पकडला! शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई


 शिरपूर : 


            आगामी सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शिरपूर पोलिसांनी दोन महत्त्वपूर्ण कारवाया केल्या आहेत. चोरी, घरफोडी व अवैध दारूविक्रीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा उल्लेख असलेल्या सराईत गुन्हेगार शेख आशिक ऊर्फ तोत्या शेख इब्राहीम (वय ३५, रा. कुरई, ता. वणी, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, सन २०१३ मधील सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात गेल्या १३ वर्षांपासून फरार असलेल्या सलमान खान समशाद खान पठाण याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.


📌 सराईत गुन्हेगाराविरुद्ध तडीपारीची कारवाई :- 


         आगामी सण-उत्सवाच्या काळात परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने शेख आशिक ऊर्फ तोत्या शेख इब्राहीम याच्याविरुद्ध पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली. त्याला वणी, मारेगाव व संबंधित परिसरातून तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिल्याचे स्पष्ट झाले आहे.


 📌 १३ वर्षांपासून फरार आरोपी उत्तर प्रदेशातून जेरबंद :- 


       दरम्यान, सन २०१३ मध्ये निलजई (WCL) परिसरात सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सलमान खान समशाद खान पठाण (वय ३५, रा. उत्तर प्रदेश) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते.


                       यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपीचा माग काढला. अखेर उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.


📌 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :- 


           ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


        या मोहिमेत शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, पोलीस उपनिरीक्षक गुल्हाणे, पोलीस हवालदार सुनील दुबे व अजय वाभिटकर, पोलीस शिपाई किरण दासरवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुडमेथे तसेच होमगार्ड मोहन घागी यांनी सहभाग घेतला.


         आगामी सण-उत्सव शांततेत पार पडावेत, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे आणि फरार आरोपींना कायद्याच्या कक्षेत आणता यावे, यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. शिरपूर पोलिसांच्या या दोन्ही कारवायांमुळे पोलीस यंत्रणेच्या सतर्कतेचे दर्शन घडले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image