घुगूस मार्गावरील जन्नत हॉटेलसमोर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात निवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. शेतातून दुचाकीने वणीकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव स्विफ्ट कारने धडक दिली. या अपघातात बाळासाहेब अंकुजी टोंगे (६७, रा. प्रगतिनगर, वणी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
टोंगे हे रविवारी आपल्या मूळ गावी पुरड येथे गेले होते. काम आटोपून ते दुचाकीने वणीकडे परतत होते. सायंकाळी सुमारे चार वाजताच्या दरम्यान जन्नत हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकीला एमएच २९ एडी ७७७१ क्रमांकाच्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, टोंगे काही अंतरापर्यंत फरफटत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे प्रगतिनगरसह संपूर्ण वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. बाळासाहेब टोंगे हे जनता विद्यालयातून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.


