वणी :
पिंपरी-बाबापूर मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिक तसेच गणपती दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन युवा नेते शुभम गोरे यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवून डागडुजी केली.
पिंपरी-बाबापूर हा मार्ग परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असून, ‘नवसाला पावणाऱ्या गणपती’च्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात आली. खड्डे बुजविल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत झाली असून, गणपती भक्तांसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रस्त्याच्या प्रश्नावर केवळ प्रशासनाकडे तक्रारी किंवा निवेदने देण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न विजय चोरडिया यांनी केला. स्वखर्चातून करण्यात आलेल्या या कामामुळे नागरिकांची गैरसोय काही प्रमाणात दूर झाली असून, परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, पिंपरी-बाबापूर मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करून रस्ता चांगल्या स्थितीत ठेवण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या