वणी :
“बिना संस्कार नही सहकार... बिना सहकार नही उद्धार” या ब्रीदवाक्याला अनुसरून सहकार सप्ताह समिती, वणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार सप्ताह २०२६’चा ३ जुलै रोजी शेतकरी मंदिर, वणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात समारोप झाला. २९ जूनपासून सुरू झालेल्या या सप्ताहात विविध सामाजिक, शैक्षणिक व रचनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांना नागरिक तसेच सहकार क्षेत्रातील सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
३ जुलै रोजी शेतकरी मंदिर येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दुपारी १२ वाजता मान्यवरांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व, सहकार चळवळीसमोरील आव्हाने आणि भविष्यातील वाटचाल याबाबत अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. त्यानंतर दुपारी १ वाजता सहकार क्षेत्राशी संबंधित ‘सहकार प्रशिक्षण’ अभ्याससत्र घेण्यात आले. दुपारी २ वाजता उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यात सप्ताहादरम्यान घेण्यात आलेल्या रांगोळी व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या सोहळ्याला नागरिक व सहकार क्षेत्रातील सदस्यांची मोठी उपस्थिती होती.
मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी अध्यक्ष YDCC बँक तथा अध्यक्ष, कृ. उ. बाजार समिती श्री. विनायकराव एकरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वणीचे अध्यक्ष अॅड. देविदासजी काळे होते. तसेच माजी सहकार विकास अधिकारी श्री. कवडुजी नगराळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, वणी श्री. सचिनजी कुडमेथे, केशव नागरी सहकारी पतसंस्था वणीचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी खोंड, जय जगन्नाथ म. को.-आप. ली. वणीचे अध्यक्ष श्री. संजयजी खाडे, माजी अध्यक्ष YDCC बँक तथा अध्यक्ष गुरुदेव वा. स.प.मर्या. वणी श्री. टिकारामजी कोंगरे, माँ जगदंबा ना. स.प. मर्या. पांढरकवडा शाखा वणीचे अध्यक्ष श्री. गजाजनजी बेजंकीवार, वसंत जिनिंग वणीचे अध्यक्ष श्री. प्रमोद वासेकर, आदर्श ना. सह. पत. मर्या. वणीचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील गोहोकार, एकविरा महिला ना. स. पत. मारेगावच्या अध्यक्ष सौ. किरणताई देरकर, खरेदी विक्री संघ वणीचे अध्यक्ष श्री. अशोकराव सूर, उपाध्यक्ष श्री. विलासभाऊ मांडवकर, रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणीचे उपाध्यक्ष श्री. विवेकानंद मांडवकर, संचालक श्री. सुरेशराव बर्डे तसेच पवनसुत अर्बन नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. पंकज चिकटे यांची उपस्थिती लाभली.
सहकार सप्ताहाच्या निमित्ताने २९ जूनपासून वणी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. विजया गार्डन परिसरात वृक्षारोपण, वसंत जिनिंग सभागृहात रांगोळी स्पर्धा, ग्रामीण रुग्णालय वणी येथे रुग्णांना फळवाटप व रुग्णसेवा तसेच डॉ. अनिकेत अलोणे आणि डॉ. स्वप्नील गोहोकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सहकार ही केवळ आर्थिक व्यवहाराची व्यवस्था नसून सामाजिक बांधिलकी आणि परस्पर सहकार्याची चळवळ आहे, हा संदेश या सप्ताहाच्या विविध उपक्रमांतून देण्यात आला. विविध सामाजिक उपक्रम, मार्गदर्शनपर सत्रे, स्पर्धा आणि बक्षीस वितरणामुळे ‘सहकार सप्ताह २०२६’ला वणी परिसरात विशेष महत्त्व प्राप्त झाले.
संपूर्ण सप्ताह यशस्वी करण्यासाठी सहकार सप्ताह समिती, वणीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. नागरिक, सहकार क्षेत्रातील संस्था, पदाधिकारी आणि सदस्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सप्ताहाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या