Type Here to Get Search Results !

खरी पत्रकारिता तीच..! निलेश चौधरी यांच्या तत्परतेने जखमी युवकाला मिळाली मदत


 वणी : 

         वणी–मार्डी मार्गावर रात्रीच्या अंधारात दुचाकीचा भीषण अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या युवकाला पत्रकार निलेश चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने त्याला तातडीने वैद्यकीय उपचार मिळाले. पत्रकारांच्या या समयसूचकतेमुळे एका जखमी व्यक्तीला मोठा आधार मिळाला असून, त्यांच्या मानवतावादी कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.


       मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथून वडकीजवळील येडशी गावाकडे मामा-भाची दुचाकीने प्रवास करत होते. रात्रीच्या अंधारात दुचाकीच्या हेडलाईटचा प्रकाश कमी असल्याने रस्त्यावरील मोठा खड्डा चालकाच्या लक्षात आला नाही. त्यामुळे दुचाकी खड्ड्यात गेल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत निलेश गेडाम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडले होते.


         दरम्यान, काही कामानिमित्त वणीहून त्याच मार्गाने जात असलेले पत्रकार निलेश चौधरी, राज घायवान, प्रवीण गावंडे आणि अमोल मोडक यांच्या निदर्शनास रस्त्याच्या कडेला एक अल्पवयीन मुलगी रडत बसलेली दिसली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी तातडीने वाहन थांबवून मुलीची विचारपूस केली.


       यावेळी तिचे मामा निलेश गेडाम अपघातात गंभीर जखमी झाल्याचे समोर आले. पत्रकारांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी गेडाम यांना आपल्या वाहनातून मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याने जखमीवर तातडीने उपचार सुरू झाले.


       या प्रसंगात पत्रकारांनी केवळ वृत्तांकनाची भूमिका न बजावता सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडविले. तसेच अपघाताच्या प्रसंगी घाबरलेल्या अल्पवयीन मुलीलाही त्यांनी धीर देत मदतीचा हात दिला.


       पत्रकार निलेश चौधरी, राज घायवान, प्रवीण गावंडे आणि अमोल मोडक यांच्या तत्परतेचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत असून, “संकटाच्या वेळी समाजाच्या मदतीला धावून जाणे, हीच खरी पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image