येथील जैताई मंदिर परिसरातील रहिवासी तथा महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी प्रवीणभाई जयरामभाई ठक्कर (वय ८३) यांचे रविवारी (२ ऑगस्ट) रात्री सुमारे ११.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी जपत त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. त्यांच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी मोलाची मदत होणार आहे.
ठक्कर कुटुंबावर यापूर्वीही मोठे दुःख कोसळले होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव दीपेश यांचे अकाली निधन झाले होते. त्यानंतर आता प्रवीणभाई ठक्कर यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा दुहेरी आघात झाला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी वासंतीबाई, मुलगा मनीष, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


