Type Here to Get Search Results !

फैजल खान यांचा इशारा पडला भारी; राजूरमध्ये सुरू झाली क्लीन-अप ड्राइव्ह


वणी : 

              राजूर गावातील कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते फैजल बशीर खान यांनी वेकोली प्रशासनाला दिलेल्या २४ तासांच्या अंतिम अल्टिमेटमचा परिणाम दिसून आला आहे. इशाऱ्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी वेकोली प्रशासन आणि ग्रामपंचायतीने संयुक्तपणे गावात व्यापक स्वच्छता मोहीम सुरू केली.


          सकाळी सुमारे १० वाजल्यापासून जेसीबी, ट्रॅक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या पथकासह गावातील विविध भागांत साचलेला कचरा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. रस्त्यांच्या कडेला वाढलेली झुडपे काढण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.


          गावातील स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन व संबंधित ठेकेदारांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर फैजल बशीर खान आणि मोसिम सय्यद यांनी वेकोली कार्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन छेडण्याचा इशारा देत प्रशासनाला २४ तासांचा अंतिम अल्टिमेटम दिला होता. 


      या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्याने नागरिकांनी याला जनदबावाचा विजय म्हटले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, लोकशाही मार्गाने संघटितपणे आवाज उठविल्यास प्रशासनालाही कारवाई करावी लागते, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


         📌          "हा संपूर्ण राजूरकरांचा विजय"


          यावेळी फैजल बशीर खान म्हणाले, "हा कोणत्याही एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण राजूरकरांचा विजय आहे. प्रशासनाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे हा आमचा उद्देश होता. भविष्यात पुन्हा निष्काळजीपणा झाल्यास यापेक्षाही मोठे लोकशाही आंदोलन उभारले जाईल. गावाची स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना त्यांच्या कामाचा जाब द्यावाच लागेल."


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad