वणी पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून वरळी मटका जुगार चालविणाऱ्या तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत जुगार साहित्य व रोख रक्कम असा एकूण ३,१६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पहिल्या कारवाईत पोलिस कॉन्स्टेबल गणेश शिवराम मेश्राम यांच्या फिर्यादीवरून अश्पाक खान अब्बास खान (वय ३८, रा. मोमिनपुरा, वणी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई २ जुलै रोजी सायंकाळी भाजीमंडी येथील नगर परिषद शौचालय परिसरात करण्यात आली. आरोपीकडून वरळी मटका पावती बुक, कार्बन पेपर, डॉट पेन तसेच १,७४० रुपये रोख जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ गजानन सावसाकडे यांच्याकडे आहे.
दुसऱ्या कारवाईत पोलिस शिपाई लोकेश बाबाराव मसराम यांच्या फिर्यादीवरून संजय शंकर गौरकार (वय ५२, रा. सावरकर चौक, वणी) याच्याविरुद्ध ज्योती बारच्या गल्लीत कारवाई करण्यात आली. आरोपी लोकांकडून पैसे घेऊन वरळी मटका जुगार चालवत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून मटका पट्टी बुक, कार्बन तुकडा, डॉट पेन व ७२० रुपये रोख जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक विशाल राठोड करीत आहेत.
तिसऱ्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रविण देवीदास हिरे यांच्या फिर्यादीवरून सतीश प्रभाकर जोशी (वय ५७, रा. बीएसएनएल कार्यालयाजवळ, वणी) याच्याविरुद्ध ब्राम्हणी फाटा परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून वरळी मटक्याच्या चिठ्ठ्या, डॉट पेन आणि ७०० रुपये रोख जप्त करण्यात आले. या प्रकरणाचाही तपास पोलीस नाईक विशाल राठोड करीत आहेत.
तीन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले असून, वणी पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायाविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आल्याचे सांगितले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या