शहरातील महादेव नगरी, चिखलगाव परिसरातील शिव अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज विजयभान यादव (२९) हे दूध व्यवसाय करतात. त्यांचे आई-वडील आणि पत्नी हे दोन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील मूळ गावी गेले असल्याने ते वणीत एकटेच राहत होते. दूध व्यवसायाचे ठिकाण खडबडा मोहल्ला येथे असल्याने ते अनेकदा रात्री तेथेच मुक्काम करतात.
२३ जूनच्या रात्री त्यांनी फ्लॅटला कुलूप लावून व्यवसायाच्या ठिकाणी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतल्यावर मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट उघडे असून संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. सुरुवातीला कोणती वस्तू चोरीला गेली आहे, हे स्पष्ट झाले नव्हते.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील आई-वडिलांशी संपर्क होत नसल्याने दुसऱ्या दिवशी चंद्रपूरहून आलेल्या बहिणींसह घराची पाहणी करण्यात आली. २५ जून रोजी आईशी संपर्क झाल्यानंतर कपाटातील ट्रॉलीमध्ये ठेवलेले १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, दोन सोन्याचे टॉप्स, नाकातील नथ आणि ५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे उघड झाले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या