वणी :
वणी पोलिसांनी १३ जून रोजी शहरातील विविध भागांत अवैध वरळी मटका जुगाराविरोधात विशेष मोहीम राबवत तब्बल ६ ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत १० आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून २ आरोपी फरार आहेत. पोलिसांनी एकूण ४,६८० रुपयांची रोख रक्कम तसेच मटका साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी सिंधी कॉलनी, एकता नगर, ब्राम्हणी फाटा चौक, दीपक चौपाटी जत्रा मैदान, नगर परिषद परिसर आणि भाजी मंडी या ठिकाणी छापे टाकले. कारवाईदरम्यान आरोपींकडून वरळी मटका पट्ट्या, कार्बन पेपर, बॉलपेन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
पहिल्या कारवाईत सिंधी कॉलनी परिसरातून आसिद खान आमीर खान पठाण व हरीष सुरेश कापसे यांच्याकडून ९५० रुपये जप्त करण्यात आले. दुसऱ्या कारवाईत एकता नगर परिसरातून दायाराम फत्ते यादव व सय्यद अलताफ सय्यद रजाक यांच्याकडून ७५० रुपये जप्त करण्यात आले.
तिसऱ्या कारवाईत ब्राम्हणी फाटा चौकातील रिलॅक्स बारसमोर अक्षय जगन दुपारे याला ५३० रुपयांच्या मुद्देमालासह पकडण्यात आले. चौथ्या कारवाईत दीपक चौपाटी जत्रा मैदान परिसरातून शंकर गणपत धंदरे याच्याकडून १,४८० रुपये जप्त करण्यात आले असून त्याचा साथीदार आसिद खान मेहबुब खान फरार आहे.
पाचव्या कारवाईत नगर परिषदेजवळील ज्योती बार गल्ली परिसरातून सय्यद शेरु सय्यद ताज व मंगेश शंकर शेंद्रे यांच्याकडून ३६० रुपये जप्त करण्यात आले. सहाव्या कारवाईत भाजी मंडी परिसरातून सोहेल खान अकबर खान याच्याकडून ६१० रुपये जप्त करण्यात आले असून त्याचा साथीदार बबलू ऊर्फ सय्यद जाफर सय्यद ननू फरार आहे.
सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) तसेच संबंधित तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध प्रकरणांचा पुढील तपास वणी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. वणी पोलिसांच्या या सलग कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार व्यवसायावर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या