वणी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर झाला. यंदाच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच आपली सरशी सिद्ध केली असून, गुणवत्ता यादीपासून उत्तीर्णतेच्या प्रमाणापर्यंत मुलींचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हे चित्र दिसत असताना, मुलांचे शिक्षणाकडे कमी होत चाललेले लक्ष ही चिंतेची बाब ठरत आहे.
मोबाईल, सोशल मीडियाचा अतिरेक, अभ्यासातील सातत्याचा अभाव आणि करिअरबाबतची अनिश्चितता यामुळे अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे शिक्षक आणि पालकांचे मत आहे. दुसरीकडे मुली मात्र नियमित अभ्यास, शिस्तबद्ध नियोजन आणि जिद्दीच्या जोरावर सातत्याने यश मिळवत आहेत. त्यामुळे बदलत्या स्पर्धात्मक युगात मुलांनीही वेळेचे नियोजन, अभ्यासातील सातत्य आणि ध्येय निश्चित करून शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेक पालकांनीही हा निकाल मुलांसाठी ‘चिंतनाची घंटा’ असल्याची भावना व्यक्त केली आहे.
यंदा वणी तालुक्यातील १८ उच्च माध्यमिक विद्यालयांमधून एकूण १ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १ हजार ३३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ७५.२२ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील एकाही शाळेला यावर्षी १०० टक्के निकाल गाठता आला नाही.
निकालात लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील अस्तांगी चंदू परेकार हिने ९४.८३ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर स्वरा महेश मुळेवार हिने ९४ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांचे निकाल पुढीलप्रमाणे लागले आहेत.
लोकमान्य टिळक महाविद्यालय – ७९.४२%
शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय – ८३.६९%
आदर्श जुनिअर कॉलेज, घोन्सा – ५९.२५%
पंचशील जुनिअर कॉलेज, नांदेपेरा – ५५.३५%
गुरुदेव जुनिअर कॉलेज, शिरपूर – ७८.१२%
जि. प. उर्दू जुनिअर कॉलेज, वणी – ३३.३३%
आदर्श जुनिअर कॉलेज, वणी – ८७.५०%
राष्ट्रीय जुनिअर कॉलेज, राजूर – ५५.५५%
आदर्श जुनिअर कॉलेज, शिंदोला – ८३.३३%
जगन्नाथबाबा जुनिअर कॉलेज, वांजरी – ३०%
वणी पब्लिक स्कूल – ९३.८४%
जगन्नाथ महाराज जुनिअर कॉलेज, वणी – ८०%
नुसाबाई चोपणे उच्च माध्यमिक विद्यालय, वणी – ७९.०६%
वणी लायन्स इंग्रजी मीडियम स्कूल – ९४.४४%
राजे संभाजी जुनिअर कॉलेज, कायर – ३८.८८%
महात्मा जोतिबा फुले जुनिअर कॉलेज, कायर – ४६.५७%
भास्करराव ताजने जुनिअर कॉलेज, वेळाबाई – ६८.५७%
भास्करराव ताजने उच्च माध्यमिक विद्यालय, कळमना – ५४.८३%
निकालानंतर यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शिक्षण क्षेत्रात मुलींची वाढती कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे. त्याचवेळी मुलांनीही या निकालातून प्रेरणा घेत स्वतःच्या अभ्यासपद्धतीत बदल करून नव्या स्पर्धेसाठी सज्ज होण्याची गरज व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या