Type Here to Get Search Results !

‎पाणी विकणाऱ्या गाड्यांच्या चालकांची वाढती मुजोरी, नागरिकांत संताप

वणी :

‎             शहरात पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला असून, गल्लीबोळांतून फिरून पाणी विकणाऱ्या गाड्यांच्या चालकांच्या मुजोरीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या करून पाणी वितरण केल्याने वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


‎           वणी शहरात शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची मागणी वाढल्याने अनेक खासगी प्लांटधारकांनी पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. शहरातील विविध भागांत १० रुपयांत २० लिटर पाणी देणारे ‘वॉटर एटीएम’ही मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. नगर परिषदेकडे अद्याप शुद्ध पाणी पुरवठ्याची सक्षम व्यवस्था नसल्याने या व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे.


‎             दरम्यान, पाणी विक्रीसाठी छोट्या वाहनांतून फिरणारे चालक अनेकदा रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून ग्राहकांना पाणी पुरवतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. वाहनचालकांनी गाडी बाजूला घेण्याची विनंती केल्यास काही चालकांकडून उद्धट वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. “थांबा ना, एवढी काय घाई आहे?” अशा स्वरात उलट नागरिकांनाच सुनावले जात असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.


‎            या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, पाणी प्लांटधारकांनी आपल्या चालकांना शिस्तीच्या सूचना द्याव्यात तसेच पोलिस प्रशासनानेही संबंधितांवर कारवाई करून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image