वणी मतदारसंघाचे केंद्रस्थान आणि व्यापार व शिक्षणाची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या वणी शहरासाठी अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या वणी बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी आमदार संजय देरकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, राज्य शासनाने या कामासाठी ८ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. यामुळे आता लवकरच वणी बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वणी शहर हे केवळ कोळसा उत्पादनाचे केंद्र नसून परिसरातील शेकडो लहान खेड्यांना जोडणारा मुख्य दुवा आहे. कोळसा खाणी आणि संबंधित उद्योगांमुळे येथे दररोज असंख्य प्रवाशांची ये-जा असते. तसेच वणी हे शिक्षणाचे मोठे केंद्र असल्याने ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी दररोज एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करतात. मात्र, गेल्या काही काळापासून परिवहन मंडळाच्या या डेपोची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. बसस्थानकावरील अस्वच्छता, मोडकळीस आलेली इमारत आणि प्राथमिक सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
विशेष म्हणजे, मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी असतानाही या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष झाले होते. एसटी महामंडळ हे ग्रामीण भागातील आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दळणवळणाचे प्रमुख साधन असल्याने, आमदार संजय देरकर यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून बसस्थानकाच्या नूतनीकरणाची गरज अधोरेखित केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अखेर ८ कोटी रुपयांचा भरीव निधी खेचून आणण्यात त्यांना यश आले आहे.
या निधीतून बसस्थानकाची नवीन सुसज्ज इमारत, प्रवाशांसाठी आधुनिक आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि अद्ययावत स्वच्छतागृहांचे निर्माण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या हक्काच्या प्रवासाला आता सुलभता मिळणार असून, आमदार देरकर यांच्या या विकासकामाचे वणी परिसरातून उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने वणीकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या