उष्णतेचा कहर वाढत असून जिल्ह्यात उष्माघाताचा धोका गंभीर पातळीवर पोहोचला आहे. मागील चार ते पाच दिवसांत तापमानात झालेल्या झपाट्याने वाढीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीचा इशारा देत नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडणे म्हणजे थेट धोका ओढवून घेण्यासारखे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तीव्र उन्हामुळे शरीरातील पाण्याची कमतरता, चक्कर येणे, अशक्तपणा आणि उष्माघातासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या सूचनेनुसार, पुरेसे पाणी पिणे, हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करणे आणि बाहेर पडताना डोके व चेहरा झाकणे अत्यावश्यक झाले आहे. मद्य, चहा, कॉफी आणि गॅसयुक्त पेयांचे सेवन टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याऐवजी लस्सी, ताक, लिंबूपाणी किंवा ओआरएससारख्या पेयांचा वापर करणे गरजेचे आहे.
उन्हात काम करणाऱ्यांसाठी विशेष धोका निर्माण झाला असून दुपारच्या वेळेत श्रमाची कामे टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शरीर अस्वस्थ वाटल्यास किंवा चक्कर आल्यास वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते.
उष्माघात झालेल्या व्यक्तींसाठीही प्रशासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. बाधित व्यक्तीला तात्काळ थंड ठिकाणी हलवून शरीर थंड करण्याचे प्रयत्न करावेत आणि शक्य तितक्या लवकर रुग्णालयात दाखल करावे. वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, पशुधनालाही उष्णतेचा फटका बसत असून त्यांना सावलीत ठेवून पुरेसे पाणी देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. उष्णतेची ही लाट हलक्यात घेणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेऊन स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हीच काळाची गरज आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या