शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भालर क्वार्टर येथील अजय भोजराज टोंगे (वय 25) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास ते आपल्या वडिलांसह मच्छीमार्केटजवळील स्टेट बँक ऑफ इंडियामधून तब्बल 1 लाख 50 हजार रुपये काढून बाहेर पडले.
सदरची रक्कम त्यांनी त्यांच्या मोटारसायकल (MH29AZ6917) च्या डिक्कीमध्ये ठेवून लॉक केली आणि भारतमाता चौक परिसरात धान्य खरेदीसाठी गेले. मात्र काही वेळानंतर परत आल्यावर त्यांच्या गाडीच्या डिक्कीचे लॉक उघडलेले दिसून आले. डिक्की तपासली असता 1 लाख 50 हजारांपैकी फक्त 50 हजार रुपये शिल्लक होते, तर 1 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले.
या घटनेमुळे वणी शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, चोरट्यांचे धाडस वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे, बँकेमधून पैसे काढल्यानंतरच ही चोरी झाल्याने संबंधित व्यक्तीचा पाठलाग करण्यात आला होता का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, दिवसाढवळ्या अशा प्रकारे चोरी होत असल्याने वणीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या