Type Here to Get Search Results !

पूर्व नागपूर मतदारसंघाच्या प्रभारी पदी संजय खाडे

वणी : 

‎       वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस नेते व काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. अचलपूर मतदारसंघात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीनंतर आता त्यांची पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीच त्यांच्याकडे प्रदेश सचिवपदाची जबाबदारी असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आता त्यांना अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

‎          संजय खाडे हे परिसरात शेतकरी व कामगार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध आंदोलन, मोर्चे आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. अचलपूर मतदारसंघात त्यांनी ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच जनसंपर्क वाढवण्याचे काम प्रभावीपणे केले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत पक्षाने त्यांना आता पूर्व नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरी मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.

‎         पूर्व नागपूर हा शहरी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. कधीकाळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. येथे विविध समाजघटक, कामगार वर्ग, व्यापारी आणि युवकांचा मोठा सहभाग आहे. नागपूर शहरातील नागरी प्रश्न, स्थानिक विकासकामे आणि पक्षनिष्ठा या घटकांवर मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र ठरते. त्यामुळे नागपूर पूर्व हा नागपूरच्या राजकारणात निर्णायक ठरणारा मतदारसंघ मानला जातो. 

‎       पूर्ण ताकदीने काम करणार – संजय खाडे

‎         “पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. अचलपूरमध्ये केलेल्या कामाच्या बळावर आता पूर्व नागपूरमध्येही पक्ष मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. सर्वसामान्य नागरिक, युवक, कामगार व महिलांशी थेट संवाद साधून तसेच स्थानिक पदाधिकारी व नेत्यांशी समन्वय साधून पक्ष संघटनावर भर देणे हेच माझे ध्येय राहील,” अशी प्रतिक्रिया संजय खाडे यांनी दिली आहे.

‎       संजय खाडे आपल्या निवडीचे श्रेय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. प्रतिभा धानोरकर व जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेत्यांना देतात. खाडे यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात पूर्व नागपूरमध्ये पक्ष संघटन अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image