स्थानिक गुन्हे शाखेने ‘ऑल आऊट’ मोहिमेत वणी शहरातून अवैध शस्त्रसाठा जप्त केला. तसेच दरोडा प्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यात आली. २७ फेब्रुवारी रोजी रात्री गुप्त माहितीच्या आधारे पांढरकवडा-वणी उपविभागीय पथकाने माळीपुरा परिसरात धाड टाकली. निलेश उर्फ अनिकेत कुमेश सोनटक्के (वय २२) याच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता तलवारी, चाकू व कुकरी अशी एकूण सहा धारदार अवजारे (अंदाजे किंमत १४ हजार रुपये) जप्त करण्यात आली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध आर्म अॅक्ट कलम ४/२५ अन्वये वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कोंडावार ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील फरार आरोपी अनिकेत उर्फ बांडी प्रकाश ऐगडवार (वय २६, रा. यवतमाळ) याला यवतमाळ शहरातून अटक करण्यात आली. तो दोन महिन्यांपासून फरार होता. पुढील चौकशीसाठी त्याला वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके व पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या