अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील कोपरगावात महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन लिमिटेडच्या वतीने सुधन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. दरम्यान या स्पर्धेत वणीच्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संघाने तेथील क्रिकेटचे मैदान गाजविले. सलग सहा सामने जिंकून फर्स्ट रनर अप ट्राफीही जिंकली. या उल्लेखनीय आणि दणदणीत कामगिरीने संस्थेसह वणीकरांचाही सन्मान वाढविला.
कोपरगावातील समता इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर २६ ते २८ डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्रातील अनेक नामांकित पतसंस्थांचे संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक सामन्यांतून वाट काढत रंगनाथस्वामी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक विजय बोरपे यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट संघाने सलग सहा सामने जिंकले.
थेट अंतिम फेरीत धडक देत अंतिम सामन्यात देखील संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेत फर्स्ट रनर-अपचे मानाचे स्थान पटकावत ट्रॉफी व रोख बक्षीस मिळविले. या निर्णायक सामन्यात आशिष ढवस आणि अभिजीत गाडगे यांनी अप्रतिम खेळ करत 'मॅन ऑफ द मॅच'चा मान पटकावला.
संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाने दाखवलेली शिस्तबद्ध खेळशैली, एकजूट, संयम आणि जिद्द प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवून देणारी ठरली. प्रत्येक सामन्यातील लढाऊ वृत्ती आणि आत्मविश्वासामुळे संघाने प्रतिस्पध्र्थ्यांवर आपली ठसठशीत छाप सोडली.
या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ३५ हजार ५५५, द्वितीय २५हजार ५५५, तृतीय १५ हजार ५५५, चतुर्थ १ हजार १५५ तसेच 'मॅन ऑफ द सिरीज' ११ हजार रुपये, 'मॅन ऑफ द मॅच' १ हजार ५०० अशी आकर्षक बक्षिसे ठेवली होती. हा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कोपरगावचे आ. काळे तसेच सुधनचे संस्थापक संदीप कोयटे यांच्या हस्ते पार पडला.
या यशाबद्दल वणी शहरातील नागरिक, पतसंस्थेचे सभासद कर्मचारी तसेच क्रिकेटप्रेमींनी श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था क्रिकेट संघावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हा विजय केवळ एका संघाचा नसून संपूर्ण वणी शहराचा गौरव असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या