मारेगाव :
तालुक्यातील करणवाडीफाटा परिसरात 1 जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास रस्त्यावरील कामावरून झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नरसाळा (ता. मारेगाव) येथील एक तरुण मारेगावहून आपल्या गावाकडे जात असताना वृंदावन बारसमोरील रस्त्यावर पोल उभारणीचे काम सुरू होते. रस्त्यात गोटे टाकल्याने अडथळा निर्माण झाल्याबाबत संबंधित ट्रॅक्टर चालकाला जाब विचारला असता, काही वेळातच तेथे आलेल्या ठेकेदार व त्याच्या सहकाऱ्यांनी संबंधित तरुणाला रस्त्याच्या बाजूला नेऊन कोणतेही कारण नसताना लोखंडी रॉडने पाठीवर व हातावर तसेच हातबुक्यांनी चेहरा व डोक्यावर मारहाण करून जखमी केले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी केली. जखमी तरुणाने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 118(1) व 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या