अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी केळापूर सत्र न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २ जानेवारी रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला.
वणी तालुक्यातील नायगाव (खु.) येथील प्रशांत ठाकरे (२५) याने मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात सिद्ध झाले. भीतीपोटी पीडितेने काही दिवस हा प्रकार लपवून ठेवला. प्रकृती बिघडल्यानंतर वैद्यकीय तपासणीत हा गंभीर प्रकार उघडकीस आला.
रुग्णालयामार्फत प्रथम अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. मात्र घटना वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने प्रकरण वणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी आरोपीस अटक करून पुरावे गोळा केले व दोषारोपपत्र दाखल केले.
सात साक्षीदारांच्या साक्षी व वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायाधीश अभिजित एम. देशमुख यांनी आरोपीस दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. सरकारी वकील ऍड. प्रशांत मानकर व तपास अधिकारी एपीआय माया चाटसे यांच्यासह पोलिस पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या