वणी :
आयुष्याला सामोरे जात असताना हसत खेळत आव्हाने स्वीकारा, यश-अपयशाचा आनंद घ्या आणि अपेक्षाविरहित आयुष्य जगल्यास खरा आनंद मिळतो, कारण अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे, असे प्रतिपादन लोककलावंत डॉ. दिलीप अलोने यांनी केले. तणावमुक्त विद्यार्थी अभियान व आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत आदर्श हायस्कूल, वणी येथे आयोजित ‘नो टेन्शन’ या विषयावरील कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. एल. मोहिते उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. दिलीप अलोने तर अतिथी म्हणून पर्यवेक्षक एस. आर. पिदुरकर आणि अरुणकुमार खैरे यांची उपस्थिती होती. आपल्या उगवत्या शैलीत अनेक रंजक किस्से सांगत डॉ. अलोने यांनी विद्यार्थ्यांमध्ये हास्य व सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. आयुष्याचा मनमुराद पण निर्विकार आनंद लुटण्याचा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी अरुणकुमार खैरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य आर. एल. मोहिते यांनी डॉ. अलोने यांच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी असे तणावमुक्त उपक्रम उपयुक्त ठरतात, असे नमूद केले. वैजनाथ खडसे यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास बलकी, अजय बदखल, बाबाराव कुचनकर, गणपत ठाकरे, गजानन टेंभुर्डे, रविंद्र उलमाले, विजय वासेकर, यशवंत भोयर, महेश पेरगे, सतीश बोदकुरवार, शैलजा झाडे, नीता कुडोपा, पूजा शेंगर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या