यवतमाळ जिल्ह्यात सलग वाढत असलेल्या घरफोड्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी गुन्हेगारांवर वज्राघात करत आंतरजिल्हा अट्टल घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दोन सराईत चोरांना ताब्यात घेऊन तब्बल ०८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत गुन्हेगारी साखळीच उद्ध्वस्त केली आहे.
मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या स्पष्ट व ठोस आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेची पथके संपूर्ण जिल्ह्यात सतर्क झाली होती. याच कारवाईदरम्यान दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी वणी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना लालगुडा परिसरात संशयास्पद हालचाली करणारे दोन इसम पोलिसांच्या नजरेत आले.
पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी करताच ते गडबडले. समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची भाषा वापरल्याने पोलिसांचा संशय बळावला. तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी करण्यात आली. अखेर गुन्हेगारीचे धागेदोरे उलगडत गेले आणि अट्टल घरफोडींचा पर्दाफाश झाला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे – सचिन सतोष नगराळे (आंतरजिल्हा अट्टल घरफोड्या) कार्तिक शंकर साळवे, रा. चंद्रपूर या दोघांनी वणी हद्दीत ०७ व भद्रावती हद्दीत ०१ अशा एकूण ०८ घरफोड्या केल्याची कबुली दिली. आरोपींकडून चांदीचे दागिने, टीव्ही, होम थिएटर, माईक आणि रोख रक्कम असा ₹२,०३,५८०/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
विशेष बाब म्हणजे मुख्य आरोपी सचिन नगराळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांत चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवरील हा ‘डोकेदुखीचा गुन्हेगार’ अखेर जाळ्यात अडकला आहे.
या कारवाईमुळे घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वणी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही धडाकेबाज कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सतिश चवरे, सपोनि दत्ता पेंडकर, पोउनि धनराज हाके तसेच अधिकारी व अंमलदारांच्या चमूने यशस्वीरीत्या पार पाडली.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या