वणी :
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर संसदेत कठोर शब्दांत टीका करत त्यांना जाब विचारणाऱ्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा मनसे नेते राजू उंबरकर यांच्या हस्ते नागपुर येथील रवी भवनात त्यांचा सत्कार करण्यात आला. खासदार दुबे यांच्या "वाचाळवीर" वक्तव्याला सडेतोड उत्तर दिल्याबद्दल धानोरकर यांचे अभिनंदन करण्यात आले.
नुकत्याच झालेल्या संसदीय अधिवेशनादरम्यान, खासदार निशिकांत दुबे यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती, ज्यामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. याच संदर्भात, चंद्रपूर - वणी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर व काँग्रेसच्या दोन महिला खासदारांनी संसद आवारात दुबे यांना घेरून जोरदारपणे दुबे यांना जाब विचारला व त्याच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांच्या या धाडसी भूमिकेचे राजकीय वर्तुळातून कौतुक होत आहे.
आज नागपुरात झालेल्या सत्कार समारंभात मनसेचे राजू उंबरकर यांनी खासदार धानोरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. "खासदार धानोरकर यांनी संसदेत जनतेच्या भावनांना वाचा फोडली आहे. निशिकांत दुबे यांच्यासारख्या वाचाळवीर खासदारांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवणे अत्यंत आवश्यक आहे," तर खासदार धानोरकर यांची आक्रमक भूमिका पाहता आम्हाला दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची आठवण झाली असे भावनिक उद्गार उंबरकर यांनी काढले.
यावेळी खासदार धानोरकर यांनी बोलताना सांगितले की, "जनतेने आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपण नेहमीच आवाज उठवत राहू." असे उद्गार काढले. यावेळी मनसेचे नागपूर येथील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



