शहरातील सुप्रसिद्ध क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे व वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजुरकर तर प्रमुख पाहुणे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादासजी वागदकर आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकला.
समाजात जीवन जगत असताना प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या स्वरुपात दान करतो. दानाचे विविध प्रकार आहेत. आजघडीला सर्वत्र 'गुप्त' दान मोठ्या प्रमाणात केले जाते. जेथे ज्ञानाचा सागर संचित करुन इतरांची वैचारिक भूक भागविल्या जाते. त्या चार भिंतीच्या आड असलेल्या ग्रंथालयाला, वाचनालयाला दिलेले दान हेच खरे परोपकारी ठरणारे आहे. वाचनालयामुळे भविष्यात होणाऱ्या फायद्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांचे जीवन फुलते, हाच आशावाद अंगी बाळगून अंबादास वागदरकर यांनी आपले सामाजिक दायित्व पार पाडले. तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगल्भ विचारांचा पगडा त्यांच्यावर सुरूवातीपासूनच आहे. तुमच्याकडे १० रुपये असतील तर ५ रुपयामध्ये आपली गरज भागवा व उर्वरित ५ रुपयातून आपल्या मुलाबाळांसाठी पुस्तके विकत घ्या, असा मौलिक संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर देत असत. जो वाचणार नाही, तो वाचू शकत नाही. याच विचारांचा तंतोतंत अंगिकार करून मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर यांनी मराठा सेवा संघ तर्फे सावित्रीबाई फुले वाचनालयास ११,०००/- देणगी देणार असल्याचे १ मे महाराष्ट्र दिनी जाहीर केले होते आणि दि. १४ मे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत वाचनालयाला ११,०००/- देणगी दिली असे मनोगत व्यक्त करताना बोलत होते. तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी वणी तालुक्यातील रुग्णांसाठी लवकरच २ रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आणि वाचनालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर व मराठा सेवा संघ यांनी वाचनालयाला दिलेल्या ११,०००/- देणगीचा स्वीकार करून त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी मराठा सेवा संघाचे, संभाजी ब्रिगेडचे, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे, वाचनालयाचे पदाधिकारी, सदस्य, सभासद, कर्मचारी आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कोषाध्यक्ष अशोक चौधरी, प्रास्ताविक सचिव प्रा. विजय बोबडे तर उपस्थित्यांचे आभार सहसचिव गजेंद्र भोयर यांनी मानले.




