कॉ. गोविंद पानसरे हे सातत्याने पुरोगामी विचारांच्या प्रसारासाठी कृतिशील असणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते, ते स्वातंत्र्य सेनानीही होते. एका शेतमजुराचा मुलगा असूनदेखील आपल्या मेहनतीने व हुशारीने ते राज्य व राष्ट्रीय नेतृत्वस्थानी पोहचले व जनसंघर्ष करतानाच त्यांनी एक अभ्यास विचावंत म्हणून आपले विशेष स्थान निर्माण केले.
त्यांचा तरुण मुलगा कॉ. अविनाश पानसरे याचे अकाली निधन झाले, परंतु न खचता वा ना उमेद न होता त्यांनी व कॉ. उमा पानसरे यांनी पक्षाचे व जनसंघटनांचे कार्य चालूच ठेवले. मार्क्सवादाने प्रभावित होऊन त्यांनी पक्षाच्या झेंड्याखाली
कष्टकरी जनतेचे अनेक लढे लढविले, तुरुंगवास भोगला व शेवटी त्यांनी सनातनी, संकुचित विचारांना विरोध करताना हौतात्म्यही पत्करले. त्यांचा हा त्याग व संघर्ष कधीच विसरू शकत नाही. युवकांना प्रोत्साहन देण्यात त्यांचा पुढाकार होता. दरवर्षी महाराष्ट्रात युवकांच्या शिबीरास ते १० दिवस सातत्याने हजर राहत. १९८४ पासून चालू असलेला हा प्रयोग त्यांनी ते जिवंत असेपर्यंत चालू ठेवला व आता पक्षाच्या व जनसंघटनांच्या नेतृत्वस्थानी ह्याच शिबीरातून गेलेले विद्यार्थी युवक कार्यरत आहेत.
पक्षाचे व जनसंघटनांचे कार्य करतानाच त्यांनी सातत्याने इतर पुरोगामी चळवळीकडे विधायक पद्धतीने पाहून त्यांना सहकार्य केले. मग ते विद्रोही साहित्य संमेलन असो वा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम असो वा जातीअंताचा लढा असो. महात्मा फुले यांचे विचार व कार्य लोकांपुढे नेण्यासाठी त्यांनी लोकवाङ्मय गृहामार्फत विशेष पुस्तिका काढल्या. त्याचप्रमाणे कॉ. अण्णा भाऊ साठे यांचे कार्य लोकांपुढे नेण्यासाठी दरवर्षी कॉ. अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक संमेलनही परवले. शाहू महाराजांच्या कार्याविषयी त्यांनी पुस्तिका लिहिलीच, परंतु १०० व्याख्यानांचा संकल्प करून
अनेक व्याख्याने देखील दिली. शिवाजी कोण होता? हे त्यांचे पुस्तक आज देशभरात गाजले आहे. देशातील अनेक भाषांत भाषांतर होऊन त्यांच्या ४० लाख प्रती खपल्या आहेत व अजूनही खपताहेत. या पुस्तिकेप्रमाणेच त्यांनी आणखी बऱ्याच पुस्तिका लिहिल्या व त्याही लोकप्रिय झाल्या.
असे असताना कॉ. पानसरे यांचे खुनी अद्याप मोकाट आहेत याची खंत आहे व त्यांना शासन होईल याची खात्री शासनाने निर्माण करावी ही अपेक्षा आहे व जनतेने त्यासाठी योग्य तो दबाव आणावा हे आवाहन आहे.


