Type Here to Get Search Results !

नांदेपेराच्या लेकीची भरारी, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर सपना ढवस यांची जिल्हा परिषद शाळेत निवड


 वणी : 


       जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने पाहिलेले शिक्षिका होण्याचे स्वप्न अखेर साकार केले आहे. सपना ढवस यांची पवित्र पोर्टलमार्फत जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून निवड झाली असून, त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


         सपना ढवस यांचा जन्म वणी शहराजवळील नांदेपेरा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद, कुरई शाळेत झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात घेतले. महाविद्यालयीन जीवनात त्या अत्यंत शांत आणि अलिप्त स्वभावाच्या होत्या. बारावीच्या सराव परीक्षेच्या निकालानंतर प्रथम आल्यानंतर त्यांच्या प्राध्यापकांनी वर्गात “सपना ढवस कोण ?” असे विचारल्याचा प्रसंग त्यांच्या साधेपणाची आणि शांत स्वभावाची आठवण करून देणारा आहे. बारावीच्या परीक्षेत त्यांनी वणी शहरातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविले. त्यानंतर शिक्षिका होण्याचे ध्येय निश्चित करून त्यांनी वणी येथील डी.एड. महाविद्यालयात प्रवेश घेतला.


    डी.एड. पूर्ण केल्यानंतर वणी येथील लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. विवाहानंतर काही काळ खाजगी नोकरीतून ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. काही काळ दुसऱ्या शाळेत काम केल्यानंतर पूर्वीच्या शाळेतील वातावरण आणि आपुलकी लक्षात घेऊन त्यांनी पुन्हा त्याच शाळेत शिक्षिका म्हणून काम सुरू केले.


    खासगी शाळेत नोकरी करत असतानाच त्यांनी जि.प. शाळेत शिक्षिका होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. नोकरी, संसार आणि जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी स्वतःचा अभ्यास सुरू ठेवला. TET आणि CTET परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांनी TAIT 2025 मध्ये 136 गुणांची उल्लेखनीय कामगिरी केली.


     अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आणि सप्टेंबर 2026 मधील शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलमार्फत त्यांची जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून निवड झाली. त्यांना वणी शहरापासून जवळच असलेल्या मानकी येथील जिल्हा परिषद शाळेत नियुक्ती मिळाली आहे.


     या यशाबद्दल लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूलचे अकॅडेमिक डायरेक्टर तथा प्राचार्य प्रशांत गोडे यांनी सपना ढवस यांचे अभिनंदन केले. त्यांच्या मनातील जि.प. शाळेत शिक्षिका होण्याचे स्वप्न व ते मिळविण्याची जिद्द आणि चिकाटी सुरुवातीपासूनच दिसत होती आणि एक दिवस त्यांना निश्चितच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. तसेच शाळेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि शाळेचे व्यवस्थापन यांनीही सपना ढवस यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


       ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास आता त्याच शिक्षणव्यवस्थेत शिक्षिका म्हणून सुरू झाला आहे. सपना ढवस यांची ही यशोगाथा म्हणजे जिद्द, मेहनत आणि ध्येयावरच्या अढळ विश्वासाची प्रेरणादायी कहाणी आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image