Type Here to Get Search Results !

मोबाईलचा अतिवापर, हट्टीपणा अन् अभ्यासाची गोडी; डॉ. दिपक घरझोडे यांनी पालकांना केले मार्गदर्शन


 वणी :


      मुलांचे संगोपन अधिक प्रभावी, प्रेमळ आणि सकारात्मक पद्धतीने करण्यासाठी लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सौम्य पालकत्व (Soft Parenting)’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दि. ३ ऑक्टोबर रोजी वणी लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, देशमुखवाडी येथे नर्सरी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ही कार्यशाळा पार पडली.


      कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष तुषार नगरवाला उपस्थित होते.


      कार्यक्रमाच्या प्रारंभी संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मनोगत व्यक्त करत कार्यशाळेमागील उद्देश स्पष्ट केला. आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांचे संगोपन करणे हे पालकांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. मुलांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रेम आणि सकारात्मक संवादाची जोड देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


     कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. दिपक घरझोडे यांनी सुमारे सव्वा तास पालकांशी संवाद साधत सौम्य पालकत्वाचे महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. मुलांचे मानसशास्त्र समजून घेणे, मोबाईलचा अतिवापर, मुलांचा हट्टीपणा, अभ्यासाची आवड निर्माण करणे तसेच पालक आणि मुलांमधील सुसंवाद यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.


       ‘आपल्या एका तासाने आपल्या मुलाचे आयुष्य बदलू शकते!’ हा डॉ. घरझोडे यांचा संदेश पालकांसाठी प्रेरणादायी ठरला. मुलांवर केवळ दबाव टाकण्याऐवजी त्यांना समजून घेणे, त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणे आणि त्यांच्या भावनांचा आदर करणे, या बाबींचे महत्त्व त्यांच्या मार्गदर्शनातून अधोरेखित झाले.


      कार्यशाळेनंतर लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर तसेच क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला आणि खुशी नगरवाला यांच्या हस्ते डॉ. दिपक घरझोडे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेला नर्सरी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रश्नोत्तरांच्या सत्रात पालकांनी सक्रिय सहभाग घेत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.


      कार्यक्रमाचे सुरेख संचालन किरण बुजोणे यांनी केले, तर सुनिता खुसपुरे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image