Type Here to Get Search Results !

नांदेपेरा-शेलू रस्ता नरकयातनांचा; आश्वासनांचा फुगा फुटला, ७ ऑक्टोबरला चक्काजाम


 वणी : 


           नांदेपेरा ते शेलू तसेच नांदेपेरा ते रांगणा या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. धुळीचे साम्राज्य, खड्डे आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे संतप्त झालेल्या शेलू ग्रामस्थांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नांदेपेरा रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन वणी पोलिसांना देण्यात आले आहे.


          या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात यापूर्वी ३ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, गावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रशासनाकडून रस्ता लवकर दुरुस्त करण्याचे आश्वासन मिळाल्याने प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही रस्त्याच्या दुरुस्तीचे ठोस काम सुरू झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


             रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि धुळीमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी रुग्णांना या मार्गावरून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वारंवार अपघात होत असल्याने या मार्गाच्या तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.


         मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वाखाली शेलू येथील ग्रामस्थांनी वणी पोलिसांना निवेदन देत ७ ऑक्टोबर रोजी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याची माहिती दिली. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


      या आंदोलनाची प्रत उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), तहसीलदार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.


       निवेदन देताना मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, विनोद कुचणकर, सूरज काकडे, प्रतीक बुरडकर, गजानन कोंडेकर, शुभम मस्की, दिलीप गुंजेकर, विशाल मालेकर, रुपेश जोगी, राहुल कोंडेकर, आशिष दानव, सचिन काकडे, कवडू नवले तसेच वनिता आवारी, सुंदराबाई गिरसावळे, रेखा आगलावे, सुफला कोंडेकर, नंदा मडावी यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image