करंजी-घुगुस-चंद्रपूर या ८८ किलोमीटरच्या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, मूलभूत सुविधा नसतानाही टोलवसुली सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी केला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पांढरकवडा कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत, तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
रस्त्यावर मोठमोठे खड्डे, जीवघेण्या भेगा, अपुरी साईड पट्टी आणि अनधिकृत अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे मनसेने म्हटले आहे. तसेच लाल पुलिया, नांदेपेरा चौफुली, एम.आय.डी.सी., भालर चौफुली आणि चारगाव चौक परिसरात धुळीचे साम्राज्य असून साफसफाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
करारातील अटींनुसार रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असतानाही दिशादर्शक फलक, स्ट्रीट लाईट्स, किलोमीटर स्टोन आणि कार्यरत वजन काटा यांसारख्या सुविधांचा अभाव असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी झाडे तोडण्यात आली; मात्र त्यानंतर आवश्यक वृक्षारोपण झाले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
रस्त्याची दुरुस्ती, अतिक्रमण हटविणे, धूळ साफसफाई आणि वृक्षारोपण होईपर्यंत टोलवसुली बंद करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. तसेच ८८ किलोमीटर रस्त्याच्या नियमित पाहणीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“PWD ने तातडीने कारवाई केली नाही, तर मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. तसेच कथित वृक्षतोड व करारातील उल्लंघनाविरोधात NGT आणि उच्च न्यायालयात दाद मागू,” असा इशारा राजू उंबरकर यांनी दिला.


