वाढदिवस म्हटला की केक, शुभेच्छा आणि उत्सव असा सर्वसाधारणपणे पाहायला मिळतो. मात्र, वणी येथील जमीेर खान ‘जम्मू भाई’ यांनी मुलगा आमेर खान यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवसाचा खरा आनंद इतरांच्या चेहऱ्यावर फुलवण्याचा आदर्श निर्माण केला आहे.
आमेर खान यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहर व परिसरात रुग्ण, कष्टकरी, विद्यार्थी आणि गरजू नागरिकांसाठी मदतीचा हात देण्यात आला. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच कष्टकरी फळ व भाजीपाला विक्रेत्यांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी ५१ छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रातही या उपक्रमातून महत्त्वपूर्ण मदत करण्यात आली. जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय तसेच उर्दू उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना १०० स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकलचा मोठा फायदा होणार आहे. निलापूर येथील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून स्पोर्ट्स ड्रेसचेही वाटप करण्यात आले.
या उपक्रमांमागील उद्देश केवळ वाढदिवस साजरा करणे नसून, समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे आणि इतरांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरित करणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
“वाढदिवसाची खुशी फक्त स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी,” या विचारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वणी परिसरातून कौतुक होत असून, वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.


