योगा फाऊंडेशन संचालित महाराष्ट्र योग शिक्षक संघ, शाखा यवतमाळ यांच्या सौजन्याने आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघ, शाखा वणीच्या पुढाकाराने जिल्हास्तरीय महायोगसंमेलन रविवारी (दि. २७) धनोजे कुणबी समाज सभागृह, शेतकरीनगर, चिखलगाव येथे उत्साहात पार पडले.
संमेलनाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोज निलपवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, चिखलगावच्या सरपंच रूपालीताई कातकडे, किरणताई देरकर, संजय निमकर, संजय पिंपळशेंडे, प्रमोद वासेकर, रमेश येरणे व उदयराव गोहोकार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात योगगीताने झाली. यावेळी विविध दर्जेदार लेखांचा समावेश असलेल्या गजानन कासावार यांनी संपादित केलेल्या ‘योगानुभूती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना आमदार संजय देरकर यांनी दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच वणी येथे योगभवन उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संजीवरेड्डी बोदकुरवार, रूपाली कातकडे यांनी मनोगत व्यक्त करून संमेलनास शुभेच्छा दिल्या.
प्रमुख मार्गदर्शक योगाचार्य डॉ. कृणाल महाजन यांनी निरोगी आयुष्य, सुख-समाधान आणि परमोच्च आनंदासाठी कुंडलिनी जागृतीचे महत्त्व स्पष्ट केले. कुंडलिनी शक्तीचे स्थान व स्वरूप सांगताना आसने, प्राणायाम, मुद्रा, बंध आणि ध्यानाच्या माध्यमातून तिच्या जागृतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या पूजा देवराव देऊरकर यांनी नियमित योगसाधनेच्या माध्यमातून दुर्लभ आजारांवर मात करत जागतिक स्तरावर मिळवलेल्या यशाचा संघर्षमय प्रवास उपस्थितांसमोर मांडला. त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले.
महायोगसंमेलनाची सुरुवात सकाळच्या योगवर्गाने झाली. प्रा. गजानन आघळते यांनी प्रात्यक्षिकांसह योगासने व प्राणायामाचे महत्त्व सांगितले. सतीश पिंपळे यांनी ध्यानाचे महत्त्व स्पष्ट केले, तर विलास पलीकोंडावार व प्रशांत रोकडे यांनी शरीरशुद्धी क्रियांचे प्रात्यक्षिक करून घेतले.
तिसऱ्या सत्रात प्रा. गोविंद फुके यांनी जीवनशैलीजन्य आजारांवरील योगोपचाराबाबत मार्गदर्शन केले. डॉ. संजय रत्नपारखी यांनी अंतर्मनाच्या प्रवासातून सप्तचक्रांच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली. मानसशास्त्रज्ञ डॉ. गणेश सव्वालाखे यांनी ताणतणाव कमी करून मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
उद्घाटन कार्यक्रमात विरंगुळा योग वर्ग, पूसद, जगन्नाथ बाबा योग ग्रुप चिखलगाव व शंकर बाबा योग ग्रुप चिखलगाव येथील महिलांनी विविध आसने, प्राणायाम, सूर्यनमस्कार तसेच मनोवेधक सामूहिक योगनृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महायोगसंमेलनाचे संयोजक लक्ष्मण इद्दे यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली जेनेकार, नानाजी विधाते, प्रशंसा श्रीवास्तव व अश्विनी ढेंगळे यांनी केले. आभार या संमेलनाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष दिगंबर गोहोकार, वसंतराव उपरे व ममता श्रीवास्तव यांनी मानले.
संमेलनाच्या यशस्वितेसाठी अरुण झाडे, संजय पोटदुखे, रामराव गोहोकार, सुधाकर गारघाटे, जयप्रकाश राजुरकर, परशुराम ढुमणे, पांडुरंग देठे, मनोहर पूसदेकर, तानाजी पाऊनकर, अशोक पारखी, प्रकाश नागतूरे, बळीराम पूसनाके, संजय बदखल, रेखा उपरे, सुनीता झाडे, नीता श्रीपदमावार, स्मिता दर्वे, वीणा गोहोकार, लता पारखी, प्रज्ञा पूसनाके, कमल पोटदुखे व प्रियंका देठे यांनी परिश्रम घेतले.

