स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी वणी येथे जाणारी १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना मारेगाव येथे समोर आली आहे. या प्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एका युवकाविरुद्ध अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला असून, मारेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 140(3) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, संबंधित तरुणी वणी येथील स्पर्धा परीक्षेच्या क्लासला जात होती. ३ सप्टेंबर रोजी दुपारी आई घरी परतल्यानंतर तरुणी घरात आढळून आली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे तसेच वणी परिसरातील विविध ठिकाणी तिचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही.
दरम्यान, तक्रारदार महिलेने एका २५ वर्षीय युवकावर आपल्या मुलीला घरातून घेऊन गेल्याचा संशय व्यक्त केला आहे. यापूर्वीदेखील संबंधित युवकाने मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, त्यावेळी मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचा दावा करण्यात आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या