Type Here to Get Search Results !

मनसेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, चनोडा गावात पहिल्यांदाच धावली लालपरी


 मारेगाव : 

 

           तालुक्यातील चनोडा गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची अनेक वर्षांपासूनची दळणवळणाची समस्या अखेर मार्गी लागली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस सेवा गावात सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. चनोडा गावात पहिल्यांदाच अधिकृत लालपरी दाखल झाल्याने ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.


          चनोडा गावात एसटी बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दररोज शिक्षणासाठी मारेगाव येथे जाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. बससेवेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. गावातील तब्बल ५४ विद्यार्थ्यांना या समस्येचा सामना करावा लागत होता. तसेच, प्रवासाची सुविधा नसल्यामुळे नागरिकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.


          मानव विकास मिशनअंतर्गत गावात बसफेरी सुरू करण्यात यावी, यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाकडे वारंवार निवेदने दिली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने समस्या कायम होती. प्रशासनाच्या या दुर्लक्षाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी पुढाकार घेतला.


         विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या उद्देशाने राजू उंबरकर यांनी जुलै महिन्यात ‘अमित ठाकरे दत्तक योजने’अंतर्गत ‘एक हात विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी’ हे ब्रीद घेऊन चनोडा ते मारेगाव मार्गावर स्वखर्चाने मोफत खासगी बस सेवा सुरू केली होती. या उपक्रमामुळे गेल्या तीन महिन्यांत ५४ विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी वणवण थांबली आणि त्यांना नियमितपणे शाळा-महाविद्यालयात जाणे शक्य झाले.


         या उपक्रमासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, मारेगाव तालुका अध्यक्ष रूपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर, वामन चटकी, रोशन शिंदे, निखिल मेहता, आकाश खामणकर आणि ॲड. योगेंद्र तुराणकर यांच्यासह मनसे सैनिकांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून परिश्रम घेतले.


        मात्र, केवळ तात्पुरती व्यवस्था करून न थांबता चनोडा गावात एसटी महामंडळाची नियमित बस सेवा सुरू व्हावी, यासाठी राजू उंबरकर यांनी प्रशासनाकडे सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून एसटी महामंडळाने चनोडा गावासाठी पहिल्यांदाच नियमित बस सेवा मंजूर करून सुरू केली आहे.


        गावात अधिकृत लालपरी दाखल होताच ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. फटाके फोडून, पेढे वाटून आणि जल्लोष करत या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करण्यात आले. अनेक वर्षांची पायपीट थांबवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट सुकर केल्याबद्दल चनोडा ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी मनसे नेते राजू उंबरकर यांचे जाहीर आभार मानले.



📌 ‘अमित ठाकरे दत्तक योजने’तून सुरू झाली होती मोफत बस


            मानव विकास मिशनअंतर्गत चनोडा गावात बसफेरी सुरू करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाकडे वारंवार निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने गावातील ५४ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मनसे नेते राजू उंबरकर यांनी ‘अमित ठाकरे दत्तक योजने’अंतर्गत स्वखर्चाने मोफत खासगी बस सेवा सुरू केली होती.


📌 सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर गावात एसटी दाखल


          विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती मोफत बससेवा सुरू केल्यानंतरही राजू उंबरकर यांनी पाठपुरावा थांबवला नाही. चनोडा गावात एसटी महामंडळाची नियमित बस सेवा सुरू व्हावी, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून गावात पहिल्यांदाच नियमित लालपरी दाखल झाली आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad